धारूर । दि . २० ।
मागील नऊ वर्षाच्या काळात देशातील सर्वसामान्य गरिबांच्या हितासाठी अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. गरजू आणि निराधार लोकांचा उत्कर्ष साधणाऱ्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी करणारे व गरिबांच्या यातना प्रत्यक्ष जगणारे संवेदनशील प्रधानमंत्री आपल्या देशाला नरेंद्र मोदी यांच्या रूपाने लाभले असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले. धारूर शहरातील पं. दीनदयाळ उपाध्याय नाट्यगृहात संपन्न झालेल्या लाभार्थी शिबिरात त्या बोलत होत्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेत्तुत्वात केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियाना अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांचे संमेलन खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी मंचावर भाजप नेते रमेशराव आडसकर, मोहनराव जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी, तालुका अध्यक्ष बालासाहेब चोले, महादेवराव तोंडे,सुनील शिनगारे, सोमनाथ बडे, शिवाजी मायकर, शेख गफार, बालासाहेब गायकवाड, विक्रांत हजारी, शिवाजी आप्पा मुंडे,दत्तात्रय धोत्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
लाभार्थी संमेलनास उपस्थित समुदायाशी संवाद साधताना खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सामान्य लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, पाणी या मूलभूत गरजा पूर्ण करत आहेत.यापूर्वी सामान्यांच्या गरजांची कुणालाही जाणीव नव्हती. मोदीजी मात्र या सर्व गरजांवर काम करत आहेत, पूर्वीच्या सरकारमध्ये आणि भाजपच्या सरकारमध्ये हा फरक आहे. सामान्य लोकांच्या डोक्यावर पक्के छत देण्यापासून, गॅस, स्वच्छतागृह ते पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्व व्यवस्था प्रधानमंत्री मोदी हे विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहेत. जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असताना मागच्या नऊ वर्षांच्या काळात यासर्व योजना मी यशस्वीपणे राबविल्या आहेत, राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करताना तरुणांना रोजगार मिळेल याचीही दक्षता आम्ही घेतली. विकासाचे हे पर्व निरंतर सुरू ठेवण्यासाठी आशीर्वाद कायम ठेवा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
सर्वसामान्यांच्या भेटी, व्यापाऱ्यांशी संवाद आणि टिफिन बैठकीत सहभाग
मोदी @9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत खा. प्रितमताई मुंडे यांनी धारूर शहर पिंजून काढले. शहरातील व्यापारी, संस्थाचालक, नगर परिषदेचे कर्मचारी ते सर्वसामान्य लोकांच्या त्यांनी भेटी घेतल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या काळातील योजना आणि कामांचा आढावा देणारे पत्रक वाटप करून मोदींना समर्थन देण्यासाठी मिस्ड कॉल देण्याच्या उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच विकासतीर्थ उपक्रमांतर्गत शहरालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली. खामगाव – पंढरपूर या पालखी मार्गाला ही त्यांनी भेट दिली. तत्पूर्वी नगर पंचायतीच्या गाळ्यांचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान कार्यकर्त्यांसोबत टिफिन बैठकीत सहभागी होऊन रुचकर भोजनाचा सर्वांसोबत आस्वाद घेतला आणि कार्यकर्त्यांशी पक्ष, संघटना याविषयी चर्चा केली.















