गेवराई: कर्जबाजारीपणाला कंटाळून एका साठ वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याने बंगाली पिंपळा शिवारात पवन चक्कीच्या शेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील सुशी येथे घडली. सदरील घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
उध्दव भगवानराव पौळ ( वय ६०) रा. सुशी ता. गेवराई जिल्हा बीड असे आत्महत्या केलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. बंगाली पिंपळा शिवारात लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांकडून समजते. दरम्यान चकलंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून त्यांच्यावर सुशी येथील पौळ यांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेचा पुढील तपास चकलंबा पोलिस करत आहेत. घटनास्थळी पो.कॉ.इंगवले यांनी भेट देवून पोलीस पंचनामा केला.