बीड दि.29 : दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजारांची लाचेची मागणी केली. तडजोडअंती 15 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईकावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस दलातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.
नितीन चंद्रकांत चौरे (वय 33, पोलीस नाईक), प्रमोद प्रताप सेंगर (ठाकूर) (वय 51 सहा.पोलीस उपनिरीक्षक) अशी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीसांची नावे आहेत. चौरे व सेंगर यांनी तक्रारदारास त्यांचे कुटुंबियांवर शेतीचे कारणावरून दाखल गुन्ह्यात तपासात मदत करून, पोलीस ठाण्यातच जामीन करण्यासाठी व प्रतिबंधक कारवाई तहसीलदार कार्यालय अंबाजोगाई येथेच करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. ही लाच 28 फेब्रुवारी 2022 रोजी मागितली होती. 2 मार्च 2022, 3 मार्च 1 एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. म्हणून याबाबत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन्ही लाचखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपळा पथक पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हात्रे यांनी केली.