एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं उग्र स्वरुप आज पाहायला मिळालं. कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील ‘सिल्वर ओक’ हे निवासस्थान गाठलं आणि गेटमधून आत प्रवेश करुन चप्पल व दगडफेक केली. याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पोहोचल्या. पण त्यांनाही कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. सुप्रिया सुळे वारंवार आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करत होत्या. तरीही आंदोलक शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.
‘सिल्वर ओक’वरील परिस्थिती चिघळल्याचं लक्षात येताच मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तातडीनं दाखल झाला. मुंबई पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील देखील पोहोचले. त्यानंतर सुप्रिया सुळेंना सुखरुपरित्या घरात पोहोचल्या. कुटुंबीयांची विचारपूस केल्यानंतर त्या पुन्हा बाहेर आल्या आणि त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले.
“मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आज माझं कुटुंब वाचलं. मी मुंबई पोलिसांचे आभार मानते. आज जो माझ्या घरावर झालेला हल्ला आहे तो अत्यंत दुर्देवी आहे. मी आताही एसटी कर्मचाऱ्यांशी बोलायला तयार आहे. मी येथे आल्यापासूनच त्यांना हातजोडून विनंती करत होते की माझी आता या क्षणाला तुमच्याशी बोलायची तयारी आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.