बीड : रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास भावाने स्वत:च्या बहिणीच्या डोक्यात चाकूने वार केल्याची घटना शहरातील सारडा कॅपीटल जवळ घडली, यामध्ये सदर तरूणी (वय 25 ) गंभीर जखमी झाली असून तिच्यासोबत अन्य एकाच्या शरिरावरही चाकूचे वार करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय दिपक बनसोडे (ता.बीड) असे बहिणीच्या डोक्यात वार करणार्या भावाचे नाव आहे. हल्लेखोर धनंजय बनसोडेच्या बहिणीचे यापुर्वी लग्न झालेले होते, मात्र तिच्या पतीचे मागच्या काही दिवसांपुर्वी निधन झालेले असून आता ती योगेश विनायक बागडे (वय 28 रा.बीड) याच्यासोबत उद्या दि. 28 फेब्रुवारी रोजी बीडच्या न्यायालयात लग्न करणार होती, या दोघांच्या लग्नाला दोन्ही परिवाराची परवानगी होती, आज लग्न असल्यामुळे ती योगेश बागडेला आपल्या सोबत घेवून रात्री सारडा कॅपीटलच्या परिसरात खरेदीला आली होती. रात्री साडे आठच्या सुमारास याठिकाणी येवून धनंजयने आपल्या बहिणीच्या डोक्यात चाकूने सपासपा वार केले, यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली आहे, तिच्यासोबत योगेशवरही चाकूचे वार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप यांनी घटनास्थळाबरोबरच जिल्हा रूग्णालयात धाव घेवून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. धनंजयचा ह्या लग्नाला स्पष्ट विरोध होता, त्यातूनच ही गंभीर घटना घडली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आपल्या बहिणीवर चाकूचे वार करताना धनंजय सोबत दोन ते तिघेजण होते, मिळालेल्या याच माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक रवि सानप यांनी सदर हल्लेखोरांना पकडण्यासाठी डीबीचे पथक मार्गस्थ केले होते, तर याबाबत रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.