माजलगाव : खाजगी सावकारकीने त्रस्त झालेल्या शेतकरी कुटुंबातील 33 वर्षीय युवकाने विषार द्रव्य पिऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी 6 वाजता तालुक्यातील राजेवाडी येथे घडली. वर्षभरापूर्वी सदरील युवकाच्या पित्यानेही कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. खाजगी सावकारकीने राजेवाडी येथे दोन बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद (33 वर्षे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या तरुणाकडे असणाऱ्या तीन एक्करवर शेतीवर खाजगी बँकेचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांकडून सांगितले जात आहे . कर्जापोटी हा ज्ञानेश्वर अनेक दिवसांपासून त्रस्त होता. परंतु बँकेचे कर्ज शेतातील नापिकीमुळे फिटत नव्हते. यामुळे त्याने आज सकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सकाळी आठ वाजता नातेवाइकांच्या लक्षात आली. बँकेतील खाजगी सावकारांचा तगादा वाढत असल्याने ज्ञानेश्वरने आत्महत्या केली असावी अशी माहिती नातेवाइकांनी दिली. दरम्यान, वर्षभरापूर्वीच ज्ञानेश्वरच्या वडिलांनीही कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. तीन दिवसांपूर्वीच त्यांचा वर्षश्राद्ध कार्यक्रम घेण्यात आका. त्यानंतर आता पित्यापाठोपाठ मुलानेही कर्जाला कंटाळून वर्षभरातच आत्महत्या केल्याने गावभर हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मयताचा चुलत भाऊ दीपक श्रीरंग महागोविंद यांच्या माहितीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.