माजलगाव : माजलगाव येथील धरणाच्या भिंतीजवळ अडीच महिन्यापूर्वी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनाच्या एका अहवालामध्ये खून केल्याचे निष्पन झाले. सदरील खून हा जमीनीच्या वादातून वडीलांच्या मदतीने पत्नीनेच केल्याचे समोर आले असून या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पत्नीसह सासर्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 सप्टेंबर रोजी माजलगाव धरणाच्या पाण्यात भिंतीलगत दत्तात्रय घायाळ यांचे प्रेत आढळून आले होते. यावेळी मयताच्या कपाळावर डोक्यावर गंभीर स्वरूपाचे जखमा होत्या. तेव्हा पोलीसांनी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. माजलगाव शहर पोलीसांनी पंचनामा करून वैदयकिय अधिकारी माजलगाव ग्रामीण रुग्णालय यांच्याकडून शवविच्छेदन केले. यावेळी तपासणी कामी मयताचा व्हिसेरा व हिस्टोपॅथ नमुने राखीव ठेवून शहर पोलिसात आकस्मात मृत्यू र.न.22/21 कलम सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल केला होता. दरम्यान मयताचा डोक्यावर व कपाळावर गंभीर स्वरुपाच्या जखमा असल्याने मयताच्या भावाने मयताच्या खून करण्यात आल्याचे पोलिसांना सांगितले होते. सदरील खून मयताची पत्नी गीता घायाळ, तिचे वडील जनार्दन मस्के यांनी जमीन नावची करून देत नाही म्हणून केला. असे फिर्यादीत सांगितले होते. दरम्यान सुमारे अडीच महिन्यानंतर 12 डिसेंबर रोजी मयत तरुण दत्तात्रय घायाळ यांचा तपासणीसाठी राखीव ठेवण्यात आलेला नमूना व्हीसेरा व हिस्टोपथचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. त्या अहवालातून सदरील यूवकाचा खुनच झाल्याचे समोर आले आहे. मयताचा भाऊ पवनराम किसन घायाळ यांच्या फिर्यादीवरून मयताची पत्नी गीता घायाळ व सासरा जनार्दन मस्के (रा.टाकरवन) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे करत आहेत.