बीड, दि.8 (लोकाशा न्युज) ः जिल्हा प्रशासनाकडून नवे जिल्हा परिषद व पंचायत समिती गट निर्मिती करण्यासाठी प्रारूप आराखडे तयार करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सुधारित परिशिष्ट-क नुसार नवे गट व गणांचे कच्चे प्रारूप आराखडे तयार करण्यात यावेत असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे आता सुधारित परिशिष्ट-क नुसार जिल्ह्यातील नवे गट हे साधारण 26 हजार ते 32 हजार लोकसंख्येच्या दरम्यान असणार आहेत. तसेच जिल्ह्यात शिरूर व धारूर तालुके सोडता इतर 9 तालुक्यात प्रत्येकी 1 जि.प. गट व प्रत्येकी 2 पं.स.गण वाढणार आहेत.
राज्य शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून कच्चे पारूप आराखडे तयार करण्यात सुरूवात करण्यात आली आहे. बीड जिल्हा परिषदेत यापूर्वी 60 सदस्य होते. आता बीड जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या 69 करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश जिल्हा परिषद गटांमध्ये बदल होणार आहेत. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकार्यांनी नुकत्याच सर्व तहसीलदारांना सूचना दिल्या असून आपल्या तालुक्याला नेमून दिलेल्या गट आणि गणांच्या संख्येनुसार नव्याने गट आणि गणांचे कच्चे आराखडे तात्काळ तयार करण्यास सांगितले आहे. मागील पंचवार्षिकच्या तुलनेत यावर्षी 9 गट आणि 18 गण वाढणार असल्याने आता जुन्या गट आणि गणातील नवीन गट आणि गण तयार होणार आहेत. तालुक्याची लोकसंख्या निश्चित केल्यानंतर जिल्ह्याच्या 20 लाख 34 हजार ग्रामीण लोकसंख्येच्या तुलनेत आता प्रत्येक जिल्हा परिषद गटाची लोकसंख्या सरासरी 30 हजाराच्या घरात असणार आहे. यात परिस्थितीनुसार 10 टक्केपर्यंत कमीअधिक लोकसंख्या करता येणार आहे. दरम्यान,
जिल्हा प्रशासनाकडून कच्चे आराखडे तयार करण्यात सुरूवात केल्याने जिल्ह्यातील धारूर व शिरूर हे दोन तालुके सोडता इतर तालुक्यात प्रत्येकी एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गट वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
—-
‘परिशिष्ट- क’ नुसार तीन पर्याय
सुधारित परिशिष्ट-क नुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या भागिले एकूण नवे गट हे सुत्र वापरण्यात येणार आहे. नवे गट तयार करतांना आवश्यकतेनुसार सरासरी लोकसंख्या, 10 टक्के जास्त लोकसंख्या व 10 टक्के कमी लोकसंख्या हे तीन पर्याय वापरता येणार आहेत. उदा-जिल्ह्याची लोकसंख्या 20 लाख 34 हजार 90 ऐवढी आहे. त्यास नव्याने तयार होत असलेल्या (69) गट संख्याने भाग दिल्यास सरासरी 29 हजार 479 ऐवढी लोकसंख्या येते. त्यात 10 टक्के जास्त केल्यास 32 हजार 427 तर 10 टक्के कमी केल्यास 26 हजार 532 ऐवढी लोकसंख्या येते. वरील तिन्ही पर्याय आवश्कतेनुसार वापरले जाणार आहेत. एकंदरीत असे केल्यास सरासरी 26532 ते 32427 ऐवढा लोकसंख्येचे नवे गट असणार आहेत.
—-
तालुक्यानिहाय असे असणार गट आणि गण
तालुका गट गण
आष्टी 08 16
पाटोदा 04 08
शिरूर 04 08
गेवराई 10 20
माजलगाव 07 14
वडवणी 03 06
बीड 09 18
केज 07 14
धारूर 03 06
परळी 07 14
अंबेजोगाई 07 14
—