मुंबई: राज्य सरकारने दारु स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणजे तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी या सरकारची नीती आहे. जनतेच्या आशीर्वादाने लोकशाही मार्गाने सरकार निवडून येतात. त्या सरकारचा प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांना समर्पित असतो. शोषित समाजाला समर्पित असतो. वंचित समाजाला समर्पित असतो. गोरगरिबांना समर्पित असतो. शेतमजुरांना समर्पित असतो. पण बेइमानीच्या आधारावर हे सरकार स्थापन झालेले आहे. जनतेने निवडून दिलेलं हे सरकार नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. दारू स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांचा हा निर्णय हर्बल वनस्पतीवाल्यांसाठी आणि क्रुझ पार्टीवाल्यांसाठी समर्पित आहे. सरकार पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करत नाही. दारूचे पण भाव कमी करून बेवड्यांना ऊर्जा देण्याचं काम हे सरकार करत आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
राजकीय पक्षांचा आडमुठेपणा
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना एसटी कामगारांच्या संपावरून भाजपवर टीका केली होती. एसटी कामगारांच्या संपावर अजूनही तोडगा निघाला नाही. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. परिवहन मंत्री अनिल परब यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते दिवस रात्र बैठका घेत आहेत. काही संघटना आणि राजकीय पक्ष आडमुठेपणाने वागत असतील तर त्यातून अडथळे निर्माण होतात, असं राऊत म्हणाले होते.