गेवराई:- गेवराई तालुक्यातील जवाहरवाडी शिवारात सोमवार दि.8 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी अचानक भिषण आग लागली. या आगीत 20 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाले असून हि आग शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या घर्षणाने लागली असल्याचे सांगितले जाते आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील जवाहरवाडी येथील शिवारात अंकुश बांगर, भाऊसाहेब बांगर, भगिनाथ बांगर, लक्ष्मण दाताळ, सुदाम चौधर, सुखदेव चौधर, गहिनीनाथ टेकाळे, शिवाजी गुजर, रामकिसन गुजर, गोव्हर्धन गुजर, राजाभाऊ गुजर या शेतकऱ्यांचा मिळून एकलगत जवळपास 20 एकर क्षेत्रावर ऊस आहे. दरम्यान सोमवार दि.8 रोजी दुपारी अचानक ऊसाला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. हि बाब लक्षात येताच शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आग ऐवढी भिषण होती की, एकलगत असलेल्या वीस एकरावरील ऊस जळून खाक झाल्यानंतरच विझली. हि आग शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीचे घर्षणाने लागल्याचे सांगितले जाते. याबाबत माहिती मिळताच जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे शेतकी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, तसेच पंचनामा केला आहे. दरम्यान या आगीत ऊस पुर्णतः जळून खाक झाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.