बीड

बीड जिल्हयात अराजकता पसरवाल तर जनता दुर्गेचं रूप घेईल – पंकजाताई मुंडेंचा जिल्हयातील सत्ताधाऱ्यांना इशारा

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास गावा-गावात आंदोलन पोहोचू,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचं धरणं आंदोलन

बीड । दिनांक१३।
बीड जिल्हा उभा करण्यासाठी खूप कष्ट लागले, सत्तेत असतांना जिल्हयाच्या भवितव्याचा प्लॅन आम्ही तयार केला होता, तो तुम्ही बिघडवू नका, इथली संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून अराजकता पसरविण्याचा प्रयत्न कराल तर जनता दुर्गेचं रूप घेऊन तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जिल्हय़ातील सत्ताधारी नेत्यांना आज दिला. दरम्यान, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दस-यापूर्वी नुकसान भरपाई देऊन त्यांची दिवाळी गोड करा अन्यथा रस्त्यावरचे हे आंदोलन गावा-गावात पोहोचू असेही त्या म्हणाल्या.

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, आ. लक्ष्मण पवार, आ.सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, आर टी देशमुख, रमेश आडसकर, मोहन जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, डाॅ. स्वरूपसिंह हजारी, अक्षय मुंदडा, उषाताई मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.

पंकजाताई मुंडे यांनी यावेळी आपल्या भाषणात जिल्हयाची होत असलेली वाताहत आणि त्याला जबाबदार असणारे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व पालकमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून माफियांना पोसणार असाल तर जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. सत्ता येऊन दोन वर्षे होत आहेत, अजूनही तुम्हाला काहीही करता आले नाही. विरोधात असताना जोर जोरात भाषणे ठोकणारे सत्तेवर येताच जनतेला विसरले, त्यांचे ‘समाजकल्याण” आहे की ‘अ-समाजकल्याण’ हे कळायला मार्ग नाही असे त्या म्हणाल्या. कोरोना काळात रेमडेसीवीर इंजेक्शनचा मोठया प्रमाणावर काळाबाजार झाला. आरोग्य खात्यात भ्रष्टाचार झाला. इंजेक्शनसाठी गरजूंना पालकमंत्र्यांची शिफारस घ्यावी लागायची. मग कोरोना त्यांच्याच शिफारशीने आला की काय? असा सवाल त्यांनी केला. कोरोना संकटात भाजपचा कार्यकर्ता धावून गेला, प्रत्येक गरजू रूग्णांना आम्ही मदत केली, लोकांचे अश्रू पुसले असे त्या म्हणाल्या.

जनतेच्या अपेक्षा पायदळी तुडविल्या

सत्तेत असतांना माझ्यावर टीका करणारे पालकमंत्री आता किती लोकांना प्रत्यक्ष भेटतात? जनतेच्या इच्छा, अपेक्षा पायदळी तुडविण्याचे काम त्यांच्याकडून झाले. सत्तेत असतांना मोबाईलवर मेसेजचा टोन वाजला की शेतकऱ्यांना समजायचे की काहीतरी मदत आलीयं. आम्ही विमा आणला, वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून सुमारे ५२ हजार कोटी रू. आणले, त्यांनी काय केले? असे त्या म्हणाल्या.

पवार, पाटील तुम्ही चुकीच्या माणसाला पाठिशी घालू नका

स्वतःचे खिसे भरण्यासाठी तुम्ही अधिकाऱ्यांना हाताशी धरता. एखाद्या माणसाचे जीवन उध्वस्त करण्यासाठी तुम्ही ऑक्ट्रासिटी करता.. या जिल्हयात काय फक्त अराजकता माजवण्यासाठी तुम्ही सत्तेत आहात का? असा सवाल पंकजाताईंनी केला. पवार साहेब, जयंत पाटील तुम्ही एकदा जिल्हयात येवून बघा, तुमच्या पक्षाची काय प्रतिष्ठा आहे, चुकीच्या माणसाला पाठिशी घालू नका असे त्या म्हणाल्या.

आमच्या अंगात मुंडेंच रक्त

आमच्या अंगात मुंडेंचं रक्त आहे. त्यांच्या धैर्य आणि धाडसाचा गुण प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे आमचा कार्यकर्ता घाबरणार नाही, पैशांनी व फंडांनी विकला जाणार नाही असे त्या म्हणाल्या. दस-यापूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा रस्त्यावर चालणारे हे आंदोलन गावा-गावात पोहोचायला वेळ लागणार नाही असे त्या म्हणाल्या.

खा. डाॅ. प्रितमताई मुंडे

राज्य सरकारने अतिवृष्टी बाधितांना सरसकट मदत करणे अपेक्षित होते,परंतु तसे होताना दिसत नाही.अतिवृष्टीच्या अस्मानी संकटाचा सामना करताना शेतकऱ्यांच्या अन्नधान्याचे नुकसान झाले,पीक उध्वस्त झाली,घरांची पडझड होऊन शेतकरी पूर्णपणे खचला असताना त्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळाले नाही ‘ हे आजच्या सत्ताधाऱ्यांच अपयश आहे.जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम करत असताना पंकजाताईंनी प्रत्येक संकटात शेतकऱ्यांना मदत केली.पंकजाताई बांधावर आल्या म्हणजे मदत नक्की मिळणार असा विश्वास तेंव्हा शेतकऱ्यांना होता,परंतु आज तो विश्वास आणि ती भावना शेतकऱ्यांमध्ये दिसत नाही असे खा. डाॅ प्रितमताई मुंडे यावेळी आपल्या भाषणात म्हणाल्या.

या आंदोलनात भाजपचे जिल्हयातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व तालुकाध्यक्ष, महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलनानंतर नुकसान भरपाईसह विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!