कोळगाव :- गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून अवैध धंदे, वाळू उपसा, सर्रासपणे सुरू आहे. याकडे स्थानिक पोलीसांचे दुर्लक्ष असल्याने घरफोड्या बरोबर मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. दि.१२ ऑक्टोबर रोजी चकलांबा पोलिसांनी मोटारसायकल चोरांस पोलीसांनी मुद्देमालासह पकडले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. हि कारवाई चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांच्या पथकाने केली आहे.
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध धंदे चोरीच्या घटन वाढत्या आहे. चकलांबा सरपंच सुरेश जाजू यांच्यासह काही ग्रामस्थांनी आरोपी शाहरुख हमीद शेख रा.शेवगांव (ता.शेवगांव जि.अहमदनगर) याला मोटारसायकल चोरताना पकडले. या आरोपीला चकलांबा ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर सपोनि भास्कर नवले यांनी आरोपी शाहरुख शेख याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अन्य सहा मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. यानंतर वेगवेगळ्या कंपनीच्या सहा मोटार सायकल अंदाजे 3 लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करून ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३०/२०२१ भा.द.वि ३७९ नूसार दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भास्कर नवले, डिगांबर पवार, पोलीस नाईक श्रीधर सानप, अमोल येळे, मुकुंद एकशिंगे, तुकाराम पवळ, महेश रुईकर यांनी केली असुन या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.