पाटोदा, दि.26:- चोरीच्या आरोपातून पारधीवस्तीवर गावातील काही लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन वर्षाचा मुलगा ठार झाला तर आठ ते दहा जण जखमी झाले. ही घटना पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. जखमींना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटने प्रकरणी पारनेर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पारनेर येथे पारधी समाजाची वस्ती आहे. येथील लोकांवर गावातील काही लोकांनी चोरीचा आरोप करत मध्यरात्रीच्या दरम्यान त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये मानु अरूण काळे हा दोन वर्षाचा मुलगा ठार झाला आहे. तर शबाना अरूण काळे, विधी भोसले, अभिमान काळे, देवराबाई काळे, वनिता भोसले, करीना चव्हाण, तारामती काळे, सोजरबाई भोसले यांच्यासह अन्य आठ ते दहा जण जखमी झाले. या जखमींना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी पारनेर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावात बंदोबस्त वाढवण्यात आला. बीड येथे डिवायएसपी यांनी भेट देवून जखमींची विचारपूस केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.