राक्षसभुवन दि. लोकाशा न्युज – गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे पुन्हा एक दुदैवी घटना घडली आहे. गावालगत असलेल्या अमृता नदीवर पुल वाहून गेल्याने कठड्यावरून नदी पार करताना गावातील एक ३५ वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून घटना आज ९ वाजता घडली आहे. दरम्यान ग्रामस्थांनी नदीकाठी मोठी गर्दी केली असून तरूणाचे शोध कार्य सुरू आहे. दरम्यान गतवर्षी याच पुलावरून गावातीलच एका नागरिकांचा दुदैवी मृत्यू झाला होता तर दोन दिवसांपूर्वी नदी पार करण्यासाठी पुलच नसल्याने एका आत्महत्या केलेल्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अक्षरश; नातेवाईकांना खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागली होती. हे विदारक चित्र असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यातच आज पुन्हा या पुलावरून तरूण वाहून गेल्याची घटना घडली असून आजून किती बळी गेल्यानंतर हा पूल करणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील भोजगाव गावालगत अमृता नदीवर पुल ऑक्टोबर २०१९ मध्ये पावसाळ्यात खचला होता. यानंतर याकडे ना प्रशासनाने लक्ष दिले ना लोकप्रतिनिधींनी , सदरील पुलाची दुरूस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी , प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यातच मागील गतवर्षी ऑक्टोबरमध्ये सतत जोरदार पावसामुळे खचलेला पुल पुरात वाहून गेला. यावेळी रात्र उशिरा गावाकडे परतणारे भोजगाव येथील महादेव संत ( वय ४० ) यांना पाण्याचा अंदाज न आल्याने खचलेल्या पुलात वाहून गेले होते. यानंतर त्यांचा तब्बल १५ तासांनंतर मृतदेह सापडला होता. दरम्यान वेळोवेळी संबंधित विभागाकडे पुल दुरूस्तीसाठी मागणी करून देखील तो दुरूस्ती न केल्यानेच महादेव संत यांचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत पुलावरच ठिय्या मांडला होता. जोपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. यानंतर या ठिकाणी आ. लक्ष्मण पवार, पोलीस, महसूल, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होऊन त्यांनी त्यांनी लवकरच पुल दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. यानंतर ही देखील पुल दुरूस्ती न झाल्याने शेवटी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या पुलाची दुरूस्ती केली होती. मात्र या वर्षी जुलै मध्ये जोरदार पावसाने नदीला पुर आला आणि दुरूस्ती केलेला पुल पुन्हा वाहून गेला. तेव्हापासून ग्रामस्थांची पुलावरील रहदारी बंद असून दळणवळणाचा प्रश्न गंभीर आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी गावातील निकिता दिनकर संत ( वय १७ ) या मुलीने आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जाताना अक्षरशः नातेवाईकांना खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागली . अखंड महाराष्ट्रामध्ये मन हेलावून गेले होते. त्यातच आज रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी निघालेले गावातील तरुण सुदर्शन संदीपान संत ( वय ३५ ) हा पुलच नसल्याने कठड्यावर नदी पार करत होता. त्यावेळी पाय घसरून तो नदीत पडून वाहून गेला रात्री झालेल्या पावसाने नदीला मोठा पुर आलेला असून नदीत तरूणाला शोधताना ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करत आहे. दरम्यान येथील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न बिकट असताना देखील प्रशासन, लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करत आहेत. तर अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी विषय प्रचंड चिड निर्माण झाली आहे.