बीड महाराष्ट्र

बीडच्या प्रेयसीकडून विदर्भाच्या प्रियकराची पुण्यात हत्या; तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची करत होता तयारी

बीड : प्रेम प्रकरणातून तरुण-तरुणींनी आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याच्या अनेक घटना पुढे येतात. मात्र, प्रेम प्रकरणातून एका प्रेयसीने आपल्याच प्रियकराचा गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा तरुण अमरावती जिल्ह्यातील तिवसा (teosa amravati) तालुक्यातील घोटा गावचा रहिवासी असून ही घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar police pune) प्रेयसीला अटक केली आहे.
सोनल पुरुषोत्त दवाळे (वय ३४), असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुण्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो गेल्या तीन ते चार वर्षांपासून फुरसुंगी येथे एका फ्लॅटवर राहत होता. याचवेळी त्याची बीडच्या एका तरुणीसोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यामध्ये संशयावरून भांडण झाले. याच भांडणाचे रुपांतर सोनलच्या जीवावर उठले. प्रेयसीने सोनलचा गळा दाबून त्याला भिंतीवर ढकलून दिले. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो घटनास्थळावर तसाच पडून होता, तरीही प्रेयसीने दुर्लक्ष केल्याचा आरोप सोनलच्या कुटुंबीयांना केला आहे. सोनलकडे दुर्लक्ष केल्याने आणि त्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सर्व प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता शवविच्छेदन अहवालात या प्रकरणाचे सत्य समोर आले. तिने गळा दाबल्याने व डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा स्पष्ट अहवाल डॉक्टरांनी दिल्यावर हडपसर पोलिसांनी आरोपी प्रेयसीला अटक करून गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात आरोपी मुलीने गळा दाबून डोक्याला मारल्याने सोनलचा मृत्यू झाला हे तपासात निष्पन्न झाले आहे. मृत सोनलच्या गळ्यावर नखाचे निशाण दिसून आले. दोघांमध्ये झालेल्या भांडणात चांगलीच झटापट झाली. घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे यामध्ये पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला, असे तपासात दिसून आले आहे. यामध्ये सोनलचा खूनच झाला हे सिद्ध झाले असता तक्रारदार निवास दवाळे यांच्या तक्रारीवरून आरोपी मुलीला अटक केली आहे.

हुशार मुलगा गमावल्याने कुटुंबीयांनी फोडला हंबरडा
घोटा या छोट्याशा गावातून आपले स्वप्न घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा सोनल दवाळे हा हुशार तरुण होता. यादव देशमुख कला वाणिज्य महाविद्यालय तिवसा येथून एनएसएसच्या माध्यमातून 26जानेवारी 2014ला मुंबईत झालेल्या परेड मध्ये सोनलची निवड झाली होती. 2008 मध्ये सीआयएसएफसाठी निवड झाली होती. मात्र, काही कारणास्तव 2010 मध्ये त्याला ही नोकरी सोडावी लागली. त्याने पुढील शिक्षण चालू ठेवून पुण्यात एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती.

आरोपी मुली कडून उडवाउडवीची उत्तरे
आपल्याकडून सोनलची हत्या झाली हे तिच्या लक्षात येतच तिने सर्व प्रकरण बनविण्याचा प्रयत्न केला. घर मालकांना बोलवून आणले. सोनल बेशुद्ध अवस्थेत पडला आहे त्याला दवाखान्यात घेऊन जायला मला मदत करा, असा बनाव तिने रचला. त्याचा मृत्यू झाला हे लक्षात आल्यानंतर घरमालकांना हडपसर पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यावेळी प्रेयसीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून संशय अधिकच बळावला. त्यानंतर तीन दिवसांत गुन्ह्याचा तपास करून त्यांनी आरोपी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सर्व घटनाक्रम सांगून गुन्ह्याची कबुली दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!