बीड

चुका करणार्‍यांना माफ करणार नाही,सीईओ अजित पवारांनी झेडपीच्या विभाग प्रमुखांचा पहिल्याच दिवशी घेतला क्लास, झेडपीच्या नव्या ईमारतीचीही केली पाहणी, सोमवारी बोलावली बैठक


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला, यावेळी त्यांनी सर्वच विभाग प्रमुखांना आपल्या केबीनमध्ये बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. चांगले काम करा, चांगले काम करणारांचा सन्मानच केला जाईल, चुका करणार्‍यांना मात्र माफी मिळणार नसल्याचे यावेळी पवार यांनी म्हटले आहे. पहिल्याच दिवशी पवारांनी विभाग प्रमुखांचा क्लास घेतल्यामुळे सर्वच विभाग जोमाने कामाला लागले आहेत.
मागच्या आठ दिवसांपुर्वीच सीईओ अजित कुंभार यांची मुंबई महानगर पालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली, त्यांच्या जागी बीड जिल्हा परिषदेला सीईओ म्हणून अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारल्यानंतर सीईओ अजित पवार यांनी सर्व विभाग प्रमुखांचा क्लास घेतला. प्रत्येक विभाग प्रमुखाला बोलावून त्यांच्याकडून त्यांच्या विभागाची संपुर्ण माहिती घेतली. काम चांगले करा, चांगले काम करणार्‍यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. मात्र चुका केल्या तर मी कोणालाही माफ करणार नाही, असेही यावेळी सीईओंनी सर्व विभाग प्रमुखांना ठणकावून सांगितले आहे. विभाग प्रमुखांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी झेडपीच्या नव्या ईमारतीची आणि सध्या सुरू असलेल्या कामाची स्वत: जावून पाहणी केली. या ईमारतीच्या कामासंदर्भात त्यांनी सोमवारी सकाळी आकरा वाजता बैठक लावली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त सीईओ आनंद भंडारी हेही उपस्थितीत होते.

केजमधील नरेगा घोटाळ्याची
फाईलही मागविली
सीईओ अजित कुंभार यांनी केज नरेगा प्रकरणात कारवाई करण्यास मंजूरी दिलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात मोठी कारवाई होणार आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी सीईओंनी या प्रकरणाची फाईल मागविली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील घोटाळेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश केव्हाही धडकू शकतात.

जिल्ह्यातील नरेगा प्रकरणाचा घेतला आढावा
जिल्ह्यात नरेगाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. हेच प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. तीन आठवड्यात या प्रकरणातील कारवाईचा अहवाल सादर करावा, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार सीईओंनी या सर्व प्रकरणाचाही यावेळी अधिकार्‍यांकडून आढावा घेतला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!