महाराष्ट्र

उदयनराजेंना करोनाची लागण; पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

सातारा : राज्यसभेतील भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना करोनाची लागण झाली आहे. चार दिवसांपूर्वी दिल्लीतून परतल्यानंतर उदयनराजेंना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.खासदार उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या सुरुवातीला करोनाबाधित झाल्या होत्या. उपचाराअंती करोनावर मात केल्यानंतर कल्पनाराजे भोसले यांना घरी सोडण्यात आलं. मात्र पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मातोश्री कल्पनाराजेंना रुग्णालयात दाखल केल्याचं समजल्याने खासदार उदयनराजे दिल्लीहून अधिवेशन सोडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्यात आले होते.यावेळी उदयनराजे हे देखील संपर्कात आल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला आणि करोनाची काही लक्षणेही आढळली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता उदयनराजे यांची प्रकृती उत्तम असल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितलं. मातोश्री कल्पनाराजे भोसले यांच्याही प्रकृतीत सुधारणा झाली असून त्या घरी परतल्या आहेत. तसंच, पुढील एक-दोन दिवसात उदयनराजेंनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली आहे. दरम्यान, राज्यासह देशात करोनाची दुसरी लाट ओसरल्याने या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनलॉक प्रक्रिया राबवताना संबंधित यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजनांचे पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!