बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : बीड पोलीस दलातील महिला व बालहक्क विभागात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत तुकाराम गुळभिले यांना यंदाचे राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. यावर्षी बीड जिल्ह्यातील सुर्यकांत गुळभिले हे पदक पटकावणारे एकमेव पोलीस अधिकारी ठरले आहेत.
बीड जिल्ह्याची खडान खडा माहिती असणारे आणि कोणत्याही विभागाला न्याय देणारे सुर्यकांत गुळभिले 32 वर्षापासून पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकार्यांनी सोपवलेली कामगिरी फत्ते करणारा अधिकारी म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. सुर्यकांत तुकाराम गुळभिले यांना यंदाचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यासह बीडच्या स्थानिक गुन्हा शाखेत यांनी काम केले आहे. अशक्यप्राय तपास लावणारा अधिकारी म्हणून गुळभिले यांची जिल्ह्यात ओळख आहे. यापूर्वी यांना पोलीस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले आहे. यंदाचा राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांच्या हस्ते त्यांचा गौरव केला जाणार आहे.