बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : शहरातील पालवण चौकाजवळ नाथनगर भागातील एका घरात सुरु असलेल्या कुंटणखाण्यावर पोलीस अधीक्षक आर. राजा यांचे विशेष पथक आणि एलसीबीच्या पथकाने छापा मारून दोन पिडीत महिलांची सुटका केली. यावेळी त्या पिडीतांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणार्या आंटीला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई सोमवारी (9 ऑगस्ट) दुपारी करण्यात आली.
या कारवाई बाबत सविस्तर माहिती अशी की, नाथनगर येथील एक महिला तिच्या घरातून कुंटणखाणा चालवत असून परिसरातील काही पिडीत महिलांकडून ती जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्याआधारे पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचला आणि डमी ग्राहकामार्फत (पंटर) त्या महिलेशी संपर्क साधला असता तिने दोन महिला उपलब्ध असल्याचे सांगितले. सोमवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास पोलिसांनी दोन पंटर जवळ रक्कम देऊन त्या महिलेच्या घरी पाठवले. खोलीत जाताना पंटरांनी इशारा करताच पोलिसांच्या पथकाने छापा मारला आणि दोन खोल्यातून दोन पिडीतांना ताब्यात घेतले. ती महिला (आंटी) आमच्याकडून जबदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असून मिळणार्या रकमेतील अर्धी रक्कम ती ठेऊन घेते अशी माहिती पिडीतांनी दिली. पोलिसांनी आंटीला बेड्या ठोकून तिच्या खोलीची झडती घेत रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 7 हजारांचा मुद्देमाल जप्त केला व दोन्ही पीडितांची सुटका केली. याप्रकरणी एपीआय विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून सदर आंटीवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, एलसीबीचे पोलीस निरिक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विलास हजारे, पीएसआय भारती, पोलीस कर्मचारी वाळके, उगले, बहीरवाळ, खटाणे व नेवडे यांनी पाडली.