बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात वारंवार कारवाया होऊनही अवैध वाळू तस्करी कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस वाळू चोरीचे प्रकार वाढत असताना पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या विशेष पथकाचे प्रमुख एपीआय विलास हजारे यांनी धाडसी कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत तब्बल एक कोटी पाच लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिप सुरेश पवळ (वय 25 जेसीबी चालक रा.ढाकलगाव ता.अंबड जि.जालना), सलमान मिर्झा बेग (वय 24 हायवा चालक रा.इस्मालपुरा बीड), महादेव दगडू निर्मळ (वय 35 हायवा चालक रा.सिदोड बीड) यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता गोदावरी नदीपात्रामध्ये चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राक्षस भुवन शिवारामध्ये चोरट्या मार्गाने वाळूचे उत्खनन करून विक्री करण्यासाठी घेऊन जाणार्या वाहनांवर बीड पोलीस विशेष पथकाचे प्रमुख एपीआय विलास हजारे यांच्या पथकाने छापा मारला असता दोन जेसीबी आणि दोन भारत बेंच हायवा यांना जागीच पकडले. यातील तीन वाहन चालकांनाही जागीच पकडण्यात आले असून एक वाहन चालक फरार झाला आहे. त्यांच्यावर भादवी 379, 109 आणि सह कलम 130 (3) 177 मो.वा.का.प्रमाणे चकलांबा गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत (एक कोटी पाच लाख वीस हजार) 105 20000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हजारे यांनी केलेल्या या कारवाईमुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत.