औरंगाबाद जिल्ह्यातील अंजिठा-वेरुळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या (International Buddhist Center) विकासासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत जमीन व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रशासनाला दिले.
मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सहसचिव दि.रा.डिंगळे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या एम.आर.पिंपरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत “आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या माध्यमातून बौद्धकालीन चित्रांचे जतन करणे गरजेचे आहे. अंजिठा-वेरुळ या पर्यटनस्थळाला आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात. या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल,” असे मुंडे म्हणाले. तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र विकसित करण्यासाठी अंजिठा-वेरुळ परिसरात सामाजिक न्याय विभागाच्या उपलब्ध जागेचा विचार करता येईल. या प्रकल्पासाठी जागेची निश्चिती करुन तसा प्रस्ताव शासनाला सादर करावा, त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल, असेही मुंडे यावेळी म्हणाले. यावेळी बैठकीत एम.आर.पिंपरे यांनी केंद्रातील कामांबाबत सादरीकरण केले. तसेच या प्रकल्पाचे उद्दिष्ट, जागा आणि अंदाजित खर्चाची माहिती दिली.