बीड

समता परिषदेच्या वतीने विभागस्तरीय प्रबोधन शिबिराचे आयोजन, ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके आणि उत्तमराव कांबळे यांचे लागणार मार्गदर्शन, ओबीसी समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – ॲड. सुभाष राऊत


बीड / प्रतिनिधी
केंद्र सरकारकडून ओबीसी समाजावर होत असलेला अन्याय आणि ओबीसी समाजाचे प्रश्न, समस्या यापासून सर्वसामान्य ओबीसी अनभिन्न आहे. त्यांना त्यांच्याच प्रश्नांची जाणीव करून देण्यासाठी समता परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ना. छगनरावजी भुजबळ साहेब, माजी खा. समीरभाऊ भुजबळ, माजी आ. पंकजभाऊ भुजबळ यांच्या संकल्पनेतून भव्य विभागस्तरीय प्रबोधन शिबिर बीड येथे आयोजित करण्यात आले असून ज्येष्ठ विचारवंत व लेखक प्रा. हरी नरके आणि उत्तमराव कांबळे या विचारवंतांचे या प्रबोधन शिबिरात मार्गदर्शन लाभणार आहे. तरी ओबीसी समाजातील बंधू-भगिनींनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समता परिषदेचे मराठवाडा तथा बीड जिल्हा अध्यक्ष ॲड.सुभाष राऊत यांनी केले आहे.
बीड शहरातील मॉ वैष्णव पॅलेस, एमआयडीसी, बीड या ठिकाणी रविवार दि. ८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९:३० वाजता या प्रबोधन शिबिराचे उद्घाटन महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, रवीभाऊ सोनवणे यांच्या हस्ते होणार असून दोन सत्रात होणाऱ्या या शिबिरामध्ये ओबीसी आरक्षणाचा संघर्ष आणि ना. छगनरावजी भुजबळ यांचे योगदान यासह ओबीसी जनगणना आदी विषयांवर प्रा. हरी नरके यांचे प्रबोधन होणार असून दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ विचारवंत उत्तमराव कांबळे हे ओबीसी समाजातील मागासलेपण, आर्थिक स्थिती नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाची आवश्यकता, राजकीय आरक्षण आदी विषयांवर प्रबोधन करणार आहेत. दुपारी तीन वाजता राष्ट्रगीताने या शिबीराचा समारोप होणार आहे.
सदरील कार्यक्रमांमध्ये कोव्हिड-१९ संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असून सोशल डिस्टंसिंग ठेवून मास्क आणि सॅनीटायझरचा वापर करण्यात येणार आहे. तरी ओबीसी समाजातील बंधू-भगिनींनी या प्रबोधन शिबिराचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. सुभाष राऊत यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!