बीड

बीडची समता परिषद पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पुन्हा धावली! अन्नपाणी घेऊन समता सैनिक रायगड व रत्नागिरी जिल्ह्याकडे रवाना


बीड / प्रतिनिधी
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी बीड जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुन्हा धावली असून अन्न आणि पाणी घेऊन समता परिषदेचे सैनिक रायगड जिल्ह्यातील महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अतिवृष्टीबाधित पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी रवाना झाले आहेत.
राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा समता परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ना. छगनरावजी भुजबळ साहेब तसेच माजी खा. समीरभाऊ भुजबळ, माजी आ. पंकजभाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समता परिषदेचे मराठवाडा तथा बीड जिल्हा अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेचे बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे आणि नितीन राऊत यांच्यासह समता सैनिक ५,००० चिवड्याचे पॅकेट्स, ३०० बिसलरी पाण्याची बॉक्स, ५,००० बिस्कीट पुडे बॉक्स यासह जीवनावश्यक वस्तू घेऊन रविवारी सायंकाळी रायगड जिल्ह्यातील महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अतिवृष्टी बाधित पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समता परिषदेचे बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे, नितीन राऊत, मनोज भानुसे, धनंजय काळे, धर्मराज दुधाळ, महेश व्यवहारे, नितीन शिंदे रवाना झाले आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वी देखील सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या आपत्ती प्रसंगी बीड जिल्हा समता परिषदेने असेच मदतकार्य राबवून तेथील पूरग्रस्त बांधवांना अन्न आणि पाण्याची व्यवस्था बीड येथून जाऊन केली होती. आज पुन्हा बीड जिल्हा समता परिषद रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आल्याने या मदत कार्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत, श्री संत नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक ॲड. संदीप बेदरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे, नारायण आप्पा शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी सायंकाळी समता परिषदेचे हे मदत कार्य आणि समता सैनिक रायगड जिल्ह्यातील महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याकडे रवाना झाले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!