बीड

मुलगाच हवा म्हणत अनेक वेळा केला पत्नीचा गर्भपात, नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल, पत्नीच्या तक्रारीवरून शिक्षक अटकेत


नेकनूर – दि १२ वार्ताहार
पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच हवा , या अट्टाहासास पेटलेल्या शिक्षकाने एक वेळेस नव्हे – दोन वेळेस नव्हे तब्बल सहा ते सात वेळेस आपल्या पत्नीच्या गर्भाचे लिंगनिदान करत गर्भपात केल्याची खळबळजनक घटना संबंधित शिक्षकाच्या पत्नीने फिर्याद दिल्यानंतर उघडकीस आली आहे . विशेष म्हणजे हा शिक्षक पती काही दिवसांपासून पत्नीला सोडून अवैधरित्या अन्य एका शिक्षिकेशी अनैतिक संबंध जोडून तिच्याकडेच राहत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे . या प्रकरणी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली आहे . 
चौसाळा येथील ३० वर्षीय विवाहितेने नेकनूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , तिचा पती फेरोज इस्माईल शेख ( वय ३५ ) हा २०१२ ते २०१ ९ दरम्यान माझा छळ करून मुलगाच हवा म्हणून माझ्या गर्भाचे लिंग निदान करत मुलीचा गर्भ असल्याने तो मला बळजबरीने खाली करण्यासाठी मारहाण करत असे . गर्भ खाली व्हावा यासाठी गर्भपाताच्या गोळ्या बळजबरीने खाऊ घालत असे . आतापर्यंत सहा ते सात वेळा त्याने माझा गर्भपात केला आहे . याच दरम्यान तेरडोकी येथील एका शिक्षीकेसोबत त्याने अनैतिक संबंधित प्रस्थापित केले असून तो सध्या तिच्या सोबतच राहत आहे . या प्रकरणी नेकनूर पोलिसात आरोपी फेरोज इस्माईल शेख याच्या विरोधात ३१३ , ४ ९ ८ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल होताच नेकनूर पोलिसांनी आरोपीला तेरडोकी येथून ताब्यात घेतले . आरोपी शिक्षक भूम तालुक्यातील पांढऱ्याची वाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे . तक्रारीत महिलेने म्हटले आहे की , तिचा पती त्याच्या भावाचे डोनेशन भरण्यासाठी माहेरच्यांकडून दोन लाख रुपये आण म्हणूनही छळ करत असल्याचे म्हटले आहे . या प्रकरणाचा पुढील तपास नेकनूर पोलिस ठाण्याचे ठाणेप्रमुख लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास जाधव हे करत आहेत .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!