बीड

आता जो वेळ मिळाला आहे तो ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरावा, झेडपीच्या पोटनिवडणुका स्थगितीच्या निर्णयाचे पंकजाताईंनी केले स्वागत

मुंबई, दि. 9 (लोकाशा न्यूज) : कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसर्‍या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी येथे केली. दरम्यान या निवडणूकीसंदर्भात झालेल्या निर्णयाचे पंकजाताईंनी स्वागत केले आहे. ह्या निवडणूका रद्द झाल्या, कारण काहीही असो आता जो वेळ मिळाला आहे तो वेळ ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरावा, सर्व ओबीसी आरक्षणासाठी लढणार्‍यांचे अभिनंदन, असेही पंकजाताईंनी सोशल मिडीयावर टाकलेल्या पोष्टमध्ये म्हटले आहे.
मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकार्‍यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. राज्य सरकारनं कोरोनाचं कारण देत पोटनिवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात 6 जुलै रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं पोटनिवडणुका स्थगित केल्याची माहिती दिली आहे.

पंकजाताई आणि छगन भुजबळांनी लावून धरली होती मागणी
ओबीसींच्या राजकिय आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागेपर्यंत सदर निवडणूका स्थगित कराव्यात अशी मागणी सातत्याने पंकजाताईंनी केली होती, त्यांची हीच मागणी पुढे ना. छगन भुजबळांनीही लावून धरली होती, अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून निवडणूक विभागाने सदर निवडका स्थगित केल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!