मुंबई, 30 जून : मुंबईतील कारमायकल रोडवर स्फोटकांनी कार सापडलेले प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब संबंध असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बेकायदेशीरपणे पैसे वसुली हाच सरकारचा कारभार आहे. अजित पवार यांनी दर्शन घोडावत यांच्याकडून कोट्यवधीची वसुली करून घेतली, असा सचिन वाझेनी आरोप केला आहे, असं चंद्रकांत पाटलांनी पत्रात म्हटलं आहे. ’सचिन वाझे हा अनिल परब यांच्यासाठीही वसुली करत होता. महापालिकेतील अनेक कंत्राटदारांना वसुलीसाठी अनिल परब यांनी सचिन वाझेकडून धमकी दिली. पन्नास कंत्राटदाराकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते’, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. सैफी बुर्हानी ट्रस्टची चौकशी करून त्यांच्या संचालकांकडून पन्नास कोटी खंडणी वसूल करण्याचा टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं. त्यामुळे अजित पवार, अनिल परब आणि दर्शन घोडावत यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, ही तक्रार कुठल्याही राजकीय अजेंड्यासाठी नाही. महाराष्ट्रातील जनतेचा कायद्यावरील विश्वास उडत चालला आहे. याची गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी, असंही चंद्रकांत पाटील या पत्रात म्हणाले.