बीड/अंबाजोगाई, दि. 24 (लोकाशा न्यूज):-गुरुवारी जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना घडल्या. या दोन्ही घटनांनी जिल्हा दारून गेलाय. अंबाजोगाईत चुलत भावानेच आपल्या भावाचा गळा दाबून खून केला तर खुनाची दुसरी घटना रात्री नऊ – साडे नऊच्या दरम्यान बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे घडली आहे. जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांनी मिळून पोलीस पाटलाची हत्या केली आहे.
संतोष लालासाहेब चव्हाण (वय 35, आ. बेलदार वस्ती, क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे त्या मयताचे नाव आहे. संतोषची पत्नी गंगुबाईच्या
फिर्यादीनुसार, संतोषला दारूचे व्यसन होते. संतोष आणि त्याचा चुलत भाऊ शिवाजी बळीराम चव्हाण या दोघात दारू पाजण्याच्या कारणावरून नेहमी वाद होत असत. मंगळवारी सकाळपासूनच ते दोघे मद्यपान करून सोबत होते. सायंकाळी 5 वाजता संतोषच्या घरासमोर मद्यधुंद अवस्थेत दोघे विनाकारण भांडत होते. यावेळी भांडणात शिवाजीने संतोषला बेदम मारहाण करत खाली पाडले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. हे पाहून गंगुबाईने आरडाओरडा केला असता इतर नातेवाईक धावत आले आणि त्यांनी संतोषला स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी गंगुबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शिवाजी चव्हाण याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिवाजी यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सूर्यवंशी करत आहेत. तर खुनाची दुसरी घटना बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे घडली असून ढेकणमोहा येथील भीमराव ससाणे यांच्या डोक्यात खोरे घालून त्यांना जिवे मारण्यात आले. ही घटना जुन्या वादातून घडल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये मयताचा मुलगाही जखमी झाला आहे. सदर आरोपी फरार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच डीवायएपसी संतोष वाळके यांच्यासह पिंपळनेरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पिंपळनेर ठाण्यात सुरू होती.