पुणे । दिनांक २४।
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने २६ जून रोजी राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. खासदार, आमदारांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.
२६ जून रोजी पुणे शहरातील शाहू कॉलेज येथे छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन कात्रज चौकात सर्व कार्यकर्ते सकाळी 10 वाजता एकत्र येऊन याठिकाणी ‘चक्का जाम’ करणार आहेत तर पिंपरी चिंचवड येथील पिंपरी चौकात सकाळी 11.30 वा. चक्का जाम होणार आहे. पुण्यात खा. गिरीश बापट, आ. माधुरी मिसाळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. मुक्ता टिळक, आ. भीमराव तापकीर, आ.सुनील कांबळे, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर, शहर जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ तर पिंपरी चौकात आ. महेश लांडगे, आ. लक्ष्मण जगताप, महापौर मायताई ढोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सदाशिव खाडे, ॲड मोरेश्वर शेडगे यासह असंख्य कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात सर्व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.