आष्टी- गेल्यावर्षी आष्टी तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ झालं अनेकांचे प्राण घेतले तर काहींना गंभीर जखमी केले. या घटनेला वर्षही उलटले नसतानाच पुन्हा एकदा आष्टी तालुक्यातील जंगलांमध्ये बिबट्यांचा वावर असल्याचे समोर येत आहे. दि. 17 रोजी मातावळी येथील गायनामध्ये मृत बिबट्या आढळून आल्याने पुन्हा एकदा आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे. बिबट्याचा मृत्यू हा आजाराने किंवा नैसर्गिकरीत्या झाला असावा असा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मातावळी येथील काही शेतकरी दि. 17 रोजी गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांना कुजलेल्या अवस्थेतील मृत बिबट्या आढळून आला. याबाबतची माहिती आष्टी वन विभागाला मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी वनविभागाच्या पथकाला बिबट्याचे मुंडके, दात, नख्या, कातडी आढळून आली. बिबट्याचे शरीर पूर्णपणे कुजलेले असल्याने घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावून शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच बिबट्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला आहे हे समोर येईल. परंतु बिबट्याचे सर्व अवयव घटनास्थळी मिळून आल्याने बिबट्याची शिकार झाली नसल्याचे समोर येत आहे. बिबट्याचा मृत्यू हा आजाराने किंवा वयोवृद्ध झाल्याने झाला असावा असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक ?
बिबट्याचा मृत्यू हा अंदाजे एक महिन्यापूर्वी झालेला असावा. बिबट्या ची नखे, कातडी, दात हे घटनास्थळी दिसून आले आहे. यावरून बिबट्याची शिकार झालेली नाही. बिबट्याचा मृत्यू हा आजाराने किंवा वयोवृद्ध झाल्याने झाला असावा. सेवविच्छेदननाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यू कशामुळे झाला आहे हे समोर येईल.
-श्याम शिरसाट, वनपरिक्षेत्राधिकारी आष्टी