बीड

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये, खरीप हंगामासह कोरोना स्थितीचा घेणार आढावा


बीड, । महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या दुसऱ्यांदा बीड जिल्ह्यात येत आहेत . उद्या शुक्रवारी ( दि .18 ) सकाळी दहा वाजता त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाकडून सुरु असलेली खरीप हंगामाची स्थिती , शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याबाबत डिसीसीसह राष्ट्रीयकृत बँकांना दिलेले उद्दीष्ट आणि 15 जून पर्यंत झालेले कर्ज वाटप या सर्व विषयांवर अजित पवार हे आढावा घेणार आहेत . या बरोबरच बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना व तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केलेले नियोजन या साऱ्या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रशासनाकडून आढावा घेणार आहेत . दरम्यान प्रशासकीय बैठकीनिमित्त उपमुख्यमंत्री बीडमध्ये दाखल होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीची तयारी केली जात आहे .
काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे दौरे आटोपताच अजित पवार दौऱ्यावर येत असल्याने या त्यांच्या दौऱ्याला राजकीय झालर असल्याचे बोलले जात आहे . दरम्यान , राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अजित पवार हे माजलगाव येथे आ.प्रकाश सोळंके यांनी माजलगाव येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात आले होते . तेंव्हापासून त्यांचा जिल्हा दौरा झाला नव्हता.दरम्यान आता काँग्रेस नेते व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नुकताच ऑक्सिजन प्लँट पाहणी आणि वीज उपकेंद्र उदघाटनाच्या निमित्ताने जिल्ह्याचा दौरा केला तर नगरपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा दौरा सुरू आहे . या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या दौऱ्याला महत्व आले आहे . त्यातच अजित पवार खरीप हंगाम आढावा आणि कोव्हीड आढावा घेण्याच्या कारणाने येत असले तरी त्यांच्या दौऱ्याला राजकीय झालर निश्चित आहे .
दरम्यान , दौऱ्याचा शासकीय कार्यक्रम अद्याप आला नसला तरी शुक्रवारच्या दौऱ्याच्या तयारीची जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग सुरू आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!