बीड । दिनांक १७ ।
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीला सरकारने परवानगी देऊन वारीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. वारीच्या १२५ वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे.
बीड जिल्हयातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड (ता. पाटोदा) हे वारकरी संप्रदायाचे मुळ उगमस्थान आहे. नवनाथांपैकी एक असलेल्या गहिनीनाथ यांची संजीवन समाधी याठिकाणी आहे, त्यांचेपासूनच वारकरी संप्रदायाचा आरंभ होतो. दरवर्षी या गडावरून वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरला जात असते. सद्गुरू संत वामनभाऊ महाराज यांनी १२५ वर्षापूर्वी या दिंडीची सुरवात केली होती, ही परंपरा आजही सध्याचे महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे सुरू आहे. सध्या कोरोना महामारीमुळे सरकारने या दिंडीला परवानगी दिली नाही, त्यामुळे भाविक भक्तांमध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली आहे. तथापि, गहिनीनाथ गडाच्या वारीचा विषय हा लाखो भक्तांच्या भावनेचा आणि श्रध्देचा विषय आहे. ही परंपरा अखंड चालू रहावी यासाठी सरकारने कोविड नियमांचे पालन व शासकीय नियमाप्रमाणे या वारीला परवानगी देऊन वारीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
••••