नागपूर- करोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना काही समाजकंटक डॉक्टरांवरच हल्ला करीत असल्याने डॉक्टरांचे मनोधैर्य खचत आहेत. मात्र भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधित हल्लेखोर आणि त्यांच्या नातेवाईकांवर सरकारी किंवा खासगी रुग्णालयात डॉक्टर उपचार करणार नाहीत, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांनी आज पत्रपरिषदेत दिला. डॉक्टर व रुग्णालये यांच्यावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ येत्या 18 जून रोजी देशभर निषेध दिन पाळण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
भारतात कोव्हिड मृत्यूंची संख्या इतर देशांपेक्षा कमी आहे. हा मृत्युदर कमी राखण्यात राजकीय निर्णय, प्रशासकीय अमंलबजावणी यासह अधिकचा वाटा आरोग्य यंत्रणेचा आहे हे नाकारून चालणार नाही असे सांगून डॉ. देवतळे म्हणाले की, आपल्या देशात 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोक खासगी आरोग्य सेवा घेतात. म्हणजे कोव्हिड मृत्युदर कमी राहण्यात खासगी आरोग्य यंत्रणेचा सिंहाचा वाटा आहे. मात्र असे असताना गेल्या दीड वर्षात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ले होताहेत. नागपुरात तर एका रुग्णालयालाच आग लावण्यात आली. महाराष्ट्रात महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना, वैद्यकीय व्यावसायिक हिंसाचार प्रतिबंध आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 2010 अस्तित्वात आहे. मात्र गेल्या 11 वर्षात या कायद्यात शिक्षा झालेल्यांची संख्य अत्यल्प आहे. प्रत्यक्ष निकालपत्रापर्यंत दोन ते तीन प्रकरणे गेली व त्यातही कुणालाच शिक्षा झालेली नाही. यावरून या कायद्याची अंमलबजावणी किती ढिसाळपणे होते हे लक्षात येते, असे डॉ. देवतळे म्हणाले. डॉक्टर व रुग्णालये यांच्याबाबतच्या सर्व प्रकारच्या हिंसाचाराच निषेध करण्यासाठी येत्या 18 जून रोजी निषेध दिन पाळण्यात येणार आहे. या दिवशी शहरातील सर्व दवाखाने दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहतील, असेही त्यांनी स्पष्टकेले. याप्रसंगी आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक आढाव, डॉ. सचिन गाठे, डॉ. प्रकाश देव, डॉ. सुषमा ठाकरे, डॉ. लद्दड, डॉ. मंजुषा गिरी, डॉ. कृष्णा पराते, डॉ. शेहनाज चिमथानवाला उपस्थित होते.