बीड । दिनांक १२।
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि शांतीवन संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने सुक्ष्म लक्षणे असलेल्या बीड व शिरूर येथील कोरोना बाधित रूग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन (विलगीकरण) सेंटरचे लोकार्पण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. रूग्णसेवेच्या या कार्यात प्रत्येक कार्यकर्त्याने सेवेची समीधा अर्पण करावी असं आवाहन करत हे सेंटर रूग्णांसाठी परळीसारखचं माहेरघर होईल असं मत पंकजाताई मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं.
कोरोना महामारीची जिल्हयातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पंकजाताई मुंडे यांनी परळी, बीड व शिरूर येथे कोरोना रूग्णांसाठी आयसोलेशन सेंटर सुरू करण्याची घोषणा नुकतीच केली होती, त्यानुसार परळी येथे ३ मे रोजी सेंटर सुरू करण्यात आले तर बीड व शिरूर साठीचे १०० बेडचे सेंटर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, शांतीवन आणि महारोगी सेवा समिती आनंदवन यांच्या संयुक्त सहकार्याने सिध्देश्वर इंग्लिश स्कूल येथे आजपासून रूग्ण सेवेत समर्पित करण्यात आले. सुरवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे व ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रतिमेस भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शांतीवनचे संस्थापक दिपक नागरगोजे यांनी पुष्पहार अर्पण करून तसेच फित कापून सेंटरचे उदघाटन केले व नंतर पंकजाताई व खा. प्रितमताई यांनी याची अधिकृत घोषणा केली.
यावेळी बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, कोरोनाच्या या संकटात अशा प्रकारच्या कार्यक्रमाला शुभेच्छा कशा द्याव्यात. अशा प्रसंगातून माणसाला चांगली सेवा करण्याचे जे संस्कार होणार आहेत, त्याला मी शुभेच्छा देते. राजकारण विरहित समर्पित सेवेचं लोकार्पण या माध्यमातून होत आहे, त्यात सर्वांनी मिळून काम करण्याचा संकल्प करावा. सर्व सामान्य माणसांच्या सेवेपेक्षा कोणतीही सेवा मोठी नाही. सेवा कार्याचं हे व्रत शांतीवनने अगोदर पासूनच अंगीकारले आहे, त्याचं हे काम निःस्पृह आहे. आता ही सेवा आम्ही एकत्रितपणे करत आहोत, त्यासाठी कुठलीही कमतरता भासू देणार नाही असे सांगून संपूर्ण जिल्हा लवकरात लवकर कोरोनाच्या संकटातून मुक्त व्हावा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
खासदार डॉ.प्रितमताईंनी केल्या आरोग्यासंबंधी सूचना
यावेळी बोलताना खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी रूग्णांचे आरोग्य व औषधी संदर्भात सूचना केल्या. सेंटरमध्ये येणारा प्रत्येक रूग्ण ठणठणीत होऊन सुखरूप घरी जावा अशी सेवा इथे मिळेल असा विश्वास मला आहे. कोरोनाच्या या गंभीर संकटात सर्व सामान्य जनतेला दिलासा देणारा काम व्हावं. गरज पडेल त्याला आम्ही मदत करू . या आजारात ज्यांचे आप्तस्वकीय गेले त्यांचं दुःख तर आहेच पण जे या आजाराशी सामना करताहेत त्यांना बरं करण्याचे काम आपण करू. या सेवेत रूग्णांची काळजी घेत असताना स्वतःचीही काळजी घ्या अशी सूचना त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांतीवनचे संचालक दिपक नागरगोजे यांनी करतांना या सेवेसाठी आनंदवनचे कौस्तुभ आमटे यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. कोरोना बाधित रूग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देऊन मुंडे साहेब आणि बाबा आमटे यांचे नाव उज्ज्वल करून त्यांच्या सेवेचा वारसा पुढे नेऊ असे सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी देखील आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे संचलन जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख यांनी केले. यावेळी रामराव खेडकर, मधुसूदन खेडकर, वैजीनाथ मिसाळ, विक्रांत हजारी, डाॅ. अशोक गवळी, रामदास बडे, संतोष राख, ॲड. रामकृष्ण मिसाळ, प्रकाश बडे, विवेक पाखरे, जालिंदर सानप, डाॅ. बडजाते, डाॅ. बडे, बाजीराव सानप, भागवत बारगजे, प्रल्हाद धनगुडे, एम. एन. बडे, राम कांबळे, संदीप ढाकणे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
••••