बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : ‘अच्छे दिनाच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाला फसवले आहे. कारण ‘अच्छे दिन आणू म्हणणार्या मोदींमुळेच आज बीड जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ‘भाषण करणं आणि शासन करणं’ यात मोठा फरक असतो, असा टोलाही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रज्ञा खोसरे यांनी मोदींसह केंद्र सरकारला लगावला आहे.
सध्या एकच विषयावर 24 तास चर्चा होत आहे, तो विषय म्हणजे कोरोना…कोरोनामुळे इतर सर्व विषय दबले गेले आहेत. कोरोनात दबलेल्या विषयांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून चर्चा घडवून आणली जात आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे वाढत्या महागाईच्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे. त्याअनुषंगानेच सध्या केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड प्रज्ञा खोसरे यांनीही मोदी सरकारच्या फसव्या धोरणांवर चांगलाच हल्ला चढविला आहे. मोठ्य मोठ्या घोषणा करून नरेंद्र मोदींनी केंद्रात भाजपचे सरकार आणले आणि स्वत: पंतप्रधान झाले. सत्तेवर येताच मोदींच्या सर्वच घोषणा फसव्या ठरत गेल्या, देशात अच्छे दिन आणू असे त्यांनी छाती ठोकपणे सांगितले होते. आम्ही महिलांना मोफत गॅस दिला हेही सांगायला ते कधीच कमी पडले नाहीत, जिथे संधी मिळेल तिथे त्यांनी स्वत:ची पाट थोपटून घेण्याचे काम खर्या अर्थाने केले, सध्या एका बाजूने कोरोनाचे भिषण संकट आणि दुसर्या बाजूने वाढलेल्या महागाईचा प्रत्येक नागरिकाला फटका सहन करावा लागत आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतींची वाटचाल तर हजार रूपयांकडे जात असल्याचे समोर येत आहे, गॅसच्या किंमती अशाच राहिल्या तर पुन्हा चुलींकडे गरिबांना वळण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, आणि याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार असणार आहे. तसेच पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या भावामुळे तर आता पायीच फिरलेले बरे अशी मनण्याची वेळही जनतेवर येणार आहे. याबरोबरच सध्या खाद्यतेलाचेही भाव गणनाला भिडले आहेत. मोदीजी ‘भाषण करणं आणि शासन करणं’ यात मोठा फरक असतो, मोदीजी लक्षात ठेवा, देशात वाढती हीच महागाई तुम्हाला आणि तुमच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यास मागे पुढे पहाणार नाही, असा ईशाराही अॅड. खोसरे यांनी दिला आहे.