परळी, दि. 6 (लोकाशा न्यूज) : ‘उठले का रे सर्वजण… चहा – पाणी, काडा आणि नास्त्याची व्यवस्था करा… मायेचा आधार आणि आपुलकीची साद घालणारा पंकजाताई मुंडे यांचा व्हाईस रेकॉर्डिंगचा मोबाईलवर आवाज येतो आणि सर्व स्वयंसेवक लगबगीने अगदी घरातील व्यक्तींच्या सेवेला लागावेत तसे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन केंद्रातील रुग्णांच्या सेवेला लागतात. ते रात्री झोपले का रे सर्व हे शब्द कानांवर पडेपर्यंत हा सेवेचा महायज्ञ अखंडितपणे सुरू असतो… लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पावलावर ठेऊन नव्हे तर एक पाऊल पुढे टाकत पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी जनतेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचा आपला शब्द प्रत्यक्षात उतरवला आहे. मी जरी तुमच्यापर्यंत पोहंचू शकत नसलो तरी माझा आवाज पोहंचत आहे या मुंडे साहेबांच्या वाक्याची अनेकांना आठवण येत आहे.
कोरोनाने सध्या हाहाकार उडाला आहे… दवाखाने कमी पडू लागले आहेत… लहान घरांमुळे विलगीकरण शक्य होत नाही… तर लॉक डाऊनमुळे हातावर पोट असणार्यांच्या जेवणाची अडचण… एकुण परिस्थिती अतिशय विदारक… त्यातच सत्ताधारी आपल्याच मस्तीत मग्न.. अशा विदारक परिस्थितीत जनतेकडे दुर्लक्ष करून बसतील त्या मुंडे साहेबांच्या लेकी कशा असतील… आपल्याच जनतेच्या विचारपूस करायला जाऊन कोरोनाबाधित झालेल्या पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे या स्वतः उपचार घेत असतानाही त्यांनी जनतेच्या सेवेचे व्रत हाती घेतले. जनतेची काळजी घेताना स्वतः च्या तब्येतीकडे दुर्लक्ष झाल्याने झालेला आजार बाजूला ठेवून दोन्ही बहिणींनी परळीच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनसेवेचा महायज्ञ सुरू केला असुन प्रत्येक ठिकाणी हजारो हात सेवेसाठी सरसावले आहेत…
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने परळीत आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे तर दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांना आणि ज्यांच्या घरची महिलाच आजारी आहे अशा कुटुंबांना मोफत भोजन व्यवस्था सुरू केली आहे. शिवाजी चौकातील अक्षता मंगल कार्यालयात महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. तेथे रूग्णांची अतिशय उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे या थेट संपर्कात असतात. कुणाची काही अडचण आहे का.. डॉक्टर राऊंडला आले… सर्वांना जेवण व्यवस्थित मिळाले का.. प्रत्येकाला औषध – गोळ्या आहेत अशी बारीक सारीक चौकशी करतात… ज्या गोष्टीची कमतरता वाटेल त्याची ताबडतोब पुर्तता करण्याच्या सूचना करून पुर्तता होईपर्यंत पाठपुरावा करतात. अगदी घरातील व्यक्तीप्रमाणे प्रत्येक रूग्णांची वैयक्तिक चौकशी करतात. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे आयसोलेशन सेंटरमध्ये एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखी व्यवस्था आहे. रूग्णांना स्वयंसेवक सर्व सेवा जागेवर देतात. त्यांना प्रसन्न वाटावे यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. योग, प्राणायाम करून मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंकजाताई आणि प्रितमताई या फक्त रूग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांचीच काळजी घेतात असे नाही स्वयंसेवकाचीही तेवढीच काळजी घेतात.. मास्क, सॅनिटायझरचा वापर करा हॅण्डग्लोज वापरा, निष्काळजीपणा करू नका अशा सारख्या सूचना देत असतात. त्या फक्त शरिराने इथे नाहीत बाकी तन, मन, धनानी त्या इथेच आहेत… क्षणाक्षणाला त्या स्वयंसेवक, रूग्ण आणि नातेवाईकांच्या संपर्कात असतात. एखाद्या रूग्णाला अस्वस्थ वाटू लागले तर लगेच डॉक्टरची व्यवस्था होते किंवा रुग्णाला हॉस्पीटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली जाते. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे जेवणही अतिशय दर्जेदार आणि पौष्टिक आहार असलेले… विशेष म्हणजे घरपोच जेवणही अगदी वेळेवर आणि पौष्टिक आहार मिळत असल्याने रूग्ण आणि त्यांचे नातेवाईकही समाधानाने अन्नदाता सुखी भव म्हणत पंकजाताई आणि प्रितमताई यांना आशिर्वाद देऊन जातात.