बीड

जिल्हा रूग्णालयातील लसीकरण केंद्राचे ठिकाण बदलले, आता चंपावतीमध्ये होणार लसीकरण, डॉ. पवार यांची माहिती


बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : येथील जिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी आणि त्यातून उडणारा गोंधळ लक्षात घेता आता आरोग्य विभागाने बीड शहरासाठीचे लसीकरणाचे केंद्र बदलले आहे. आता जिल्हा रुग्णालयाऐवजी नगर रोडवरील चंपावती प्राथमिक शाळेत लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली आहे. यासंदर्भात मागच्या आठ दिवसांपुर्वीच भाजपचे विक्रांत हजारी यांनी मागणी केली होती, त्यानुसार त्यांच्या या मागणीला आज खर्‍या अर्थाने यश आले आहे.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात बीड शहरासाठीचे लसीकरण सुरु होते. मात्र आता चंपावती प्राथमिक विद्यालयात सकाळी 9 ते सायं.5 या काळात कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना ऑनलाईन वेळ घेवूनच लसीकरणासाठी जावे लागणार असून 45 पेक्षा जास्त वय असणारे नागरीक थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंेदणी करु शकतील. त्या ठिकाणी एका दिवशी 200 व्यक्तींना लस दिली जाईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली आहे. जिल्हा रूग्णालय परिसरात लसीकरणाबरोबरच याच परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाच आकडा वाढत असून हा वाढता आलेख कमी करण्यासाठी येथील लसीकरण केंद्र शहरात इतरत्र हलवावे, अशी मागणी भाजपचे विक्रांत हजारी यांनी केली होती, तर मागच्या दोन दिवसांपुर्वी या ठिकाणी लसीकरणावरून मोठा गोंधळही झाला होता, येथील ही सगळी परिस्थिती लक्षात घेवूनच याठिकाणचे लसीकरण केंद्र चंपावती शाळेत हलविण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!