बीड

टाकळसिंगच्या वैद्यकीय अधिका-यांना मुजोर पोलिसांकडून बेदम मारहाण,त्या पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन

राजेंद्र जैन / कडा

तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे यांना आष्टीकडे ड्युटीवर येत असताना बुधवारी सायंकाळी च-हाटा फाट्यावर पोलिस अधिकारी व कर्मचा-यांकडून ओळखपत्र दाखवूनही बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे जोपर्यंत त्या मुजोर पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत वैद्यकीय अधिका-यांनी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन मोरे यांना वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आष्टी तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास बीडवरुन आष्टीकडे येत असताना च-हाटा फाट्यावर कोरोनाच्या नावाखाली बॅटींग करीत असलेल्या बेजबाबदार पोलिस अधिका-यांसह दोन कर्मचा-यांनी त्यांना रस्त्यावर अडवून विचारपूस न करताच बेदम मारहाण केली आहे. याप्रसंगी डाॅ. विशाल वनवे यांनी पोलिसांना आपल्याकडील मुख्यकार्यकारी अधिका-यांची आॅर्डर देखील दाखवली. मात्र त्यांचे म्हणणे काहीच ऐकून न घेता अंगात जनरल डायर संचारलेल्या पोलिसांनी डाॅक्टरला अक्षरश: एखाद्या जनावरासारखी अमानुष मारहाण केली आहे. या मारहाणीचा आष्टी तालुक्यातील सर्वच वैद्यकीय अधिका-यांनी जाहीर निषेध केला असून जोपर्यंत त्या मुजोर पोलिसांवर कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत आष्टीतील सर्व वैद्यकीय अधिका-यांनी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या महासंकटात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणा-या वैद्यकीय अधिका-यांना झालेल्या मारहाणीचा सामाजिक संघटनांनी देखील जाहीर निषेध केला असून याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!