Site icon लोकाशा-बंब न्यूज

मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी सोशल मीडियावर ८० हजार फेक अकाऊंट्स

​मुंबई :​ सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर मुंबई पोलीस आणि राज्य सरकारच्या बदनामीसाठी सोशल मीडियावर तब्बल 80 हजार फेक अकाऊंट्स तयार करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने केलेल्या तपासणीमध्ये उघड झाली आहे. सायबर सेलने याप्रकरणी तपास सुरू करत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी ही माहिती दिली आहे.

​ मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारीच सोशल मीडियावर अशी मोहीम सुरू असल्याचे स्पष्ट करतानाच चौकशीअंती ही बदनामी करणार्‍यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. 

सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी या घटनेची नोंद करून तपास सुरू केला. कूपर रुग्णालयानेही ही आत्महत्या असल्याचे त्यांच्या शवचिकित्सा अहवालात नमूद केले. त्याआधारे मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू होता. 

मात्र ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्य शासनाची बदनामी करून प्रतीमा मलिन करण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावर या दोघांविरोधात बराच मजकूर लिहिला गेला. त्यात आरोप करताना असभ्य आणि अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलीस आणि राज्य सरकारच्या बदनामी सुरू करण्यात आल्याने अखेर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याप्रकरणी तपास सुरू केला. त्यात सायबर सेलला सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर तब्बल 80 हजार बनावट खाती आढळली आहेत.

मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि राज्य शासन यांची बदनामी केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत अनेक सोशल मीडिया अकाऊंट आणि बनावट अकाऊंट असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.

मुंबई सायबर सेल या सर्व अकाऊंट्सची तपासणी करत आहे. ही 80 हजार अकाऊंट्स नव्याने उघडण्यात आली आहेत. एरव्ही मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही बोलताना दिसत नाही. कारण मुंबई पोलिसांनी आपल्या कामगिरीने जगात लौकिक मिळवला आहे. परंतु सुशांतच्या मृत्यूनंतर लगेचच म्हणजे 14 जूनपासून ही बनावट अकाऊंट्स उघडली गेली असे सायबर सेलचा अहवाल सांगतो.

Exit mobile version