मुंबई : काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते आणि मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटू लागली आहे, अशी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठे वादंग उठले आहे. तिच्यावर चौफेर बाजुने टीका होऊ लागली आहे. या वादातच आता तिच्या मुंबईस्थित ऑफिसवर महानगर पालिकेच्या काही अधिका-यांनी छापा टाकल्याचे वृत्त आहे. स्वत: कंगनाने त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करुन ही माहिती सार्वजनिक केली आहे. कंगनाने ही सुडाची कारवाई असल्याचे म्हटले आहे. कंगनाने ट्विटरवर बीएमसीकडून करण्यात आलेल्या कारवाईचा व्हिडिओ शेअर करत एकामागून एक तीन ट्विट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये तिने लिहिले, ’माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, बीएमसीची परवानगी आहे त्यानुसार माझ्या मालमत्तेत काहीही बेकायदेशीर नाही, बीएमसीने नोटीस देऊन बेकायदेशीर बांधकाम दर्शविणारे स्ट्रक्चर प्लान पाठवायला हवे, आज त्यांनी माझ्या कार्यालयावर छापा टाकला आणि उद्या ते कोणतीही नोटिस न देता पूर्ण स्ट्रक्चर तोडतील.’
माझे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे : कंगना
कंगना पुढे म्हणाली, ’हे मुंबईतील मणिकर्णिका फिल्म्सचे ऑफिस आहे, मी पंधरा वर्षे कठोर परिश्रम घेतले आहेत, चित्रपट निर्माता व्हावे, मुंबईत स्वतःचे ऑफिस असावे, हे स्वप्न मी पाहिले होते. पण आता मला हे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे. आज अचानक तेथे बीएमसीचे काही लोक आले आहेत’, असे कंगनाने सांगितले.