Site icon लोकाशा-बंब न्यूज

सुरेश रैनाच्या काकांची हत्या; चार नातेवाईकही जखमी


मुंबई पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या 58 वर्षीय काकांची हत्या झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील चार जणही जखमी झाले आहेत. अशोक कुमार असे रैनाच्या काकांचे नाव असून ते सरकारी ठेकेदार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पंजाबच्या पठाणकोटमधील थारियाल गावात 19 आणि 20 ऑगस्ट दरम्यान घडली.

अशोक कुमार यांचा ज्येष्ठ बंधू श्याम लाल यांनी ते रैनाचे काका असल्याची पुष्टी केली. सुरेश रैना लवकरच भेट देण्यास येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने मृत व्यक्ती हा क्रिकेटरचा नातेवाईक असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात काळे कच्छेवाला’ टोळीतील तीन ते चार जण घर लुटण्याच्या हेतूने आले होते. पठाणकोटच्या माधोपूरजवळील थारियाल गावात ते अशोक कुमार यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी सर्व जण आपल्या घराच्या गच्चीवर झोपले होते. अशोक कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पठाणकोटचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक गुलनीतसिंग खुराणा यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी घर फोडून काही रोकड आणि सोनं लुटलं. कुमार यांची 80 वर्षांची आई सत्या देवी, त्यांची पत्नी आशा देवी, मुले अपिन आणि कुशल हे चौघे या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती आहे.

चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का
गेल्या काही दिवसांपासून सुरेश रैना आयपीएलसाठी मोठी मेहनत घेत सराव करत होता. 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार्‍या रैनाचं पूर्ण लक्ष आता आयपीएलवरच होतं. रैनाच्या आक्रमक फलंदाजीचा सीएसकेला चांगलाच फायदा झाला असता. मात्र कौटुंबिक कारणामुळे सुरेश रैना माघारी परतल्याने संघाला धक्का बसला आहे.

Exit mobile version