Site icon लोकाशा-बंब न्यूज

…तर ‘सीबीआय’ करू शकते रियाची पॉलिग्राफ टेस्ट


मुंबई – सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीभोवती चौकशीचा फास आवळत चालला आहे. ईडी, सीबीआय आणि एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत आणि रियाची देखील कसून चौकशी केली जात आहे. मात्र, रिया तपास अधिकार्‍यांच्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देत नसल्याने सीबीआय रियासह अन्य आरोपींची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची शक्यता आहे. रियाची पॉलिग्राफ टेस्ट करण्याबाबत जोरदार चर्चा देखील सुरू आहे. काल सीबीआयने रियाची जवळपास 10 तास चौकशी केली, अनेक प्रश्न विचारले. मात्र, रिया खरं बोलते की खोटं याची तपासणी करण्यासाठी पॉलिग्राफ टेस्ट केली जाऊ शकते.

पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय?
पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे खोटं पकडण्याची चाचणी, ही विज्ञानात लावण्यात आलेल्या अनेक रंजक शोधांपैकी एक टेस्ट. यात एखादा माणूस खोटं बोलत असला की त्याच्या शारीरिक क्रियांमध्ये किंचित बदल होतात, हेच बदल टिपून तो खरं बोलतोय की खोटं हे ठरवलं जातं.

पॉलिग्राफ टेस्ट कधीपासून सुरू झाली?
पॉलिग्राफ टेस्टचा सर्वात पहिला वापर 1921 साली अमेरिकेतील जॉन ऑगस्टस लार्सन या पोलिस अधिकारी आणि वैद्यकीय अभ्यासकाने केला. एखादी व्यक्ती खरं बोलत असेल तेव्हा त्याचे रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वासोच्छवास, शरीराचं तापमान सामान्य असतं. परंतु, जेव्हा ती खोटं बोलते, तेव्हा या सर्व घटकांमध्ये बदल होऊ लागतात. रक्तदाब-नाडीचे ठोके वाढून श्वासोच्छवास जोराने होऊ लागतो, याच तत्त्वाचा वापर लार्सन यांनी केला. सन 1921 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील एका ख्रिश्चन धर्मगुरूची हत्या करण्याचा आरोप असलेल्या विल्यम हायटॉवर या व्यक्तीवर ही पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. यात हायटॉवरला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये दिसलेले निष्कर्ष याच्या आधारावर त्याला दोषी ठरविण्यात आलं. याआधी विल्यम मार्स्टन याने रक्तदाबावरून करण्यात येणार्‍या या चाचण्यांचा प्रयत्न करून पाहिला होता. या चाचण्या उपयोगी असल्याचं पटवून देण्यासाठी त्याने अनेक प्रयत्नही केले. परंतु, त्यानंतर लार्सनने केलेल्या प्रात्याक्षिकामुळे त्याला समाजात मान्यता मिळाली.

Exit mobile version