Site icon लोकाशा-बंब न्यूज

वारे प्रशासन, कोविड रूग्ण अन् लसीकरण एकाच परिसरात ! गर्दी आणि कोविड रूग्णांची संख्या टाळण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील लसीकरण केंद्र इतरत्र हालवा – विक्रांत हजारी


बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : कोरोनाची दुसरी लाट सध्या मोठ्या गतीने जिल्ह्यात पसरत आहे, असे असतानाही जिल्हा प्रशासन नेमके काय करते याचा साधा ताळमेळही प्रशासनात काम करणार्‍या अधिकार्‍यांच राहिलेला नाही, सध्या जिल्हा रूग्णालय परिसरात नेमकं कोण कशासाठी आलेय हेच समजत नाही, कारण याच परिसरात कोविड रूग्ण उपचार घेत आहेत. त्याचबरोबर लसीकरणही याच ठिकाणी सुरू आहे. परिणामी याठिकाणी होत असलेली गर्दीच कोरोनाचा आकडा वाढवित आहे. याठिकाणी होणारी गर्दी आणि त्यातून वाढणारी रूग्ण संख्या टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ जिल्हा रूग्णालय परिसरातील लसीकरण केंद्र शहरात इतर ठिकाणी हलवावे, अशी मागणी भाजप नेते विक्रांत हजारी यांनी केली आहे.
लोकनेत्या पंकजाताई आणि खा. प्रीतमताईंच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे नेते विक्रांत हजारी हे 24 तास रूग्ण सेवेला देत आहेत. त्याअनुषंगानेच रूग्णांच्या छोटट्या-मोठ्या अडचणीत ते तात्काळ धावून जात आहेत. या गंभीर परिस्थितीतच कोरोनाची संख्या घटविणारी एक महत्वाची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. सध्या बीड जिल्हा रूग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत आहेत. याबरोबरच जिल्हा रूग्णालयातच लसीकरणही केले जात आहे. यामुळे जिल्हा रूग्णालय परिसरात दररोजच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमुळे आरोग्य प्रशासनाचा ताण तर वाढतच आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हीच गर्दी कोरोनाची संख्याही वाढवित आहे. कारण लसीकरण करण्यासाठी आलेले नागरिक एकमेकांना चिटकूनच उभे असतात, अशीच परिस्थिती कोरोना बाधित नातेवाईकांचीही आहे. याचा धोका बर्‍याच जणांना होत आहे, त्यामुळेच याठिकाणची गर्दी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ जिल्हा रूग्णालयातील लसीकरण केंद्र शहरातील इतर ठिकाणी हालवावे, अशी मागणी भाजप नेते विक्रांत हजारी यांनी केली आहे.

Exit mobile version