बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने बीड जिल्ह्याला पुर्णपणे घेरले आहे. वेळेत रूग्णांना बेड, ऑक्सिजन, रेमडीसीवरचे इंजेक्शन मिळत नसल्यामुळे अनेकांना आपला जिव गमवावा लागत आहे, या गंभीर परिस्थितीवर लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी आवाज उठविला, यासंदर्भात त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून बीडचे वास्तव त्यांच्यासमोर मांडले, त्यांच्या या एका आवाजामुळे जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा आणि नेते ताळ्यावर आले, आणि रेमडीसीवरचा जिल्ह्याचा कोटा शंभरहून चक्क हजारांवर गेला असल्याचे भाजपचे युवा नेते भगिरथ दादा बियाणी यांनी म्हटले आहे.
मागची पाच वर्ष लोकनेत्या पंकजाताई मुंडे ह्या सत्तेत होत्या, या पाच वर्षात त्यांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जवळपास 25 हजार कोटींहून अधिक निधी खेचून आणला, त्यांच्या नेतृत्वाच खा. प्रीतमताई ह्या केंद्रात सक्षमपणे काम करीत आहेत. त्याही केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंडे भगिणी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या सोबतीला होत्या आणि सध्याच्या दुसर्या लाटेतही आहेत. ज्यांना या लाटेत आडचणी येत आहेत, त्यांच्या मदतीसाठी त्या तात्काळ धावून जात आहेत. मागच्या आठ दिवसांपुर्वीच खा. प्रीतमताईंनी जिल्ह्यातील प्रत्येक कोविड वार्डात जावून त्याठिकाणच्या रूग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या, ज्या ठिकाणी केंद्र सरकारची गरज भासेल, त्या ठिकाणी केंद्राची सर्व यंत्रणा जिल्हावासियांच्या सेवेत तात्काळ कार्यरत केली जाईल, असा विश्वासच यावेळी खा. प्रीतमताईंनी रूग्णांना दिलेला आहे. या संकटात मुंडे भगिणी सकारात्मक राजकारण करत असतानाच राज्यातील, जिल्ह्यातील सत्ताधारी मात्र फक्त आणि फक्त स्वार्थी राजकारण करत आहेत. यामुळे रेमडीसीवरच्या वाटपात मोठा काळाबाजार होत आहे, परिणामी वेळेवर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रूग्णांना आपले प्राणही बहाल करावे लागत आहेत. जिल्ह्यातील ही सगळी परिस्थिती लक्षात घेवूनच पंकजाताईंनी त्यावर आवाज उठविला, थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून त्यांच्यासमोर जिल्ह्यातील वास्तव आणले. त्यांच्या या एका आवाजामुळे जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा आणि नेते ताळ्यावर आले आणि रेमडीसीवरचा शंभरचा कोटा थेट हजारांवर जावून पोहचला, पंकजाताईंच्या याच कामामुळे जिल्ह्यातील अनेक गोरगरिबांना आधार मिळाला आहे आणि येणार्या काळातही मिळणार असल्याचे भाजपचे नेते भगिरथ बियाणी यांनी म्हटले आहे.