बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. ग्रामीण भागातून उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात रूग्ण आल्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांचे जेवणासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हीच गरज ओळखून कुटे ग्रुपचे सीएमडी सुरेश कुटे आणि मॅनिजींग डायरेक्टर सौ. अर्चना सुरेश कुटे यांनी स्व. ज्ञानोबराव कुटे यांच्या स्मरणार्थ जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात मोफत भोजन व्यवस्था सुरू केली आहे. याचा शुभारंभ गुरूवारी तहसीलदार श्रीराम बेंडे, उमेश शिर्के आदींसह कुटे ग्रुपच्या सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कोरोनाच्या संकटकाळात कुटे ग्रुप सुरूवातीपासूनच जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी धावला आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरसाठी कुटे ग्रुपच्या वतीने ऑक्सीजन पुरवठा यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील रूग्ण मोठ्या संख्येने उपचासाठी जिल्हा रूग्णालयात येत आहेत. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांचे लॉकडाऊनमुळे हाल होत आहेत. उपाशीपोटी राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रूग्णांच्या नातेवाईकांसाठी कुटे ग्रुपच्या वतीने मदतीचा हात देण्याचे ठरविण्यात आले अन् कुटे ग्रुपचे सी.एम.डी. सुरेश कुटे आणि एमडी अर्चना सुरेश कुटे आणि डायरेक्टर यशवंत कुलकर्णी यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात अन्नछत्र उघडण्याचा निर्णय घेतला. स्व. ज्ञानोबाराव कुटे यांच्या स्मरणार्थ नर्सिग हॉलच्या जवळ हे अन्नछत्र उभारण्यात आले असून दररोज दुपारच्या वेळी जवळपास 400 लोकांना या ठिकाणाहून भोजन पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार श्रीराम बेंडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उमेश शिर्के, कुटे ग्रुपचे राजकुमार आपेट, रवि तलबे, अमोल परस्कर, दिपक खरवडे, सतीश रांजवण, मच्छिंद्र आमटे आदींसह कुटे ग्रुपचे सदस्य आणि रूग्णांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.
गरजूंना लाभ होईल – सौ. अर्चना कुटे
कोरोनाच्या संकट काळात कुटे ग्रुप सुरूवातीपासून प्रशासनाच्या सोबत काम करीत आहे. जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी कोणतीही अन्नपाण्याची कोणतीही सोय नसल्याने ही गरज ओळखून जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात स्व. ज्ञानोबाराव कुटे यांच्या स्मरणार्थ कुटे ग्रुपच्या वतीने अन्नछत्र उभारण्यात आले आहे. यामुळे गरजूंना याचा मोठा फायदा होणार आहे.
-सौ. अर्चना सुरेश कुटे (मॅनिजींग डायरेक्टर,कुटे ग्रुप,बीड)