Site icon लोकाशा-बंब न्यूज

कोरोनातही अंबाजोगाईत सट्टेबाजी जोरात; 11 सट्टेबाजांवर गुन्हा


अंबाजोगाई, दि. 28 (लोकाशा न्यूज) : सध्या एकीकडे कोरोनाचा उद्रेक झालेला असतांनाच दुसरीकडे आयपीएल मॅचचाही सर्वत्र धुमधडाका सुरु आहे. आयपीएल’मुळे ऑनलाईन सट्टेबाजी देखील जोरात चालू आहे. अंबाजोगाईत देखील आयपीएलवर सट्टेबाजी सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर डीवायएसपी सुनील जायभाये यांच्या पथकाने छापा मारून चार सट्टेबाजांना रंगेहाथ पकडले तर सात जण पसार झाले. यावेळी पोलिसांनी 75 हजारांचा मुद्देमालही जप्त केला.

आयपीएलमध्ये मंगळवारी (दि.27) दिल्ली कॅपीटल विरुध्द रॉयल चॅलेंजर बँगलोर असा सामना पार पडला. या दरम्यान अंबाजोगाई शहरातील कुत्तर विहीर परिसरातील तानाजी मालुसरे चौकात काही सट्टेबाज या सामन्यावर सट्टा खेळत आणि खेळवत असल्याची गुंत माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या पथकास मिळाली होती. सदर माहितीची खातरजमा झाल्यानंतर जायभाये यांच्या विशेष पथकाने रात्री 08.30 वाजता या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहून 11 सट्टेबाज मोबाईल, लॅपटॉप प्रिन्टर, एलईडी या ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे सट्टा खेळत आणि खेळवत असताना आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी शिताफीने श्रीपाल धायगुडे, लक्ष्मीकांत धायगुडे, शुभम धायगुडे आणि संदिप गायकवाड या सट्टेबाजांना ताब्यात घेतले. मात्र, मनोज कालिया, निलेश डिडवाणी, सुरेश सोमाणी, श्रीकांत उर्फ गोटया गोपाळराव धायगुडे, नयन कदम, अभिषेक कदम आणि बबलू कातळे हे सट्टेबाज पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळाहून मोबाईल लॅपटॉप, प्रिंटर, एलईडी टीव्ही आणि रोख रक्कम असा एकूण 75 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस अंमलदार कसबे यांच्या फिर्यादीवरून सर्व 11 आरोपीवर महाराष्ट्र जगर प्रतिबंधक कायद्यान्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Exit mobile version