Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमधील रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवा,पंकजाताई मुंडे यांनी अजित पवारांना पत्र पाठवून मांडले जिल्हयातील वास्तव !

मुंबई । दिनांक २८।
रेमडेसीवीर इंजेक्शनचा बीडमध्ये सर्रास काळाबाजार होत असून या इंजेक्शनचा वापर विशिष्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते स्वतःच्या कार्यालयातून करत आहेत. हा सर्व प्रकार आपण स्वतः जातीने लक्ष घालून थांबवावा अशी मागणी करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जिल्हयातील वास्तव उप मुख्यमंत्री अजित पवार यांचेसमोर पत्राद्वारे मांडले आहे.

 रेमडेसीवीर इंजेक्शन वाटपाचा गैरवापर कोणीही करू नये. कोणत्याही माणसाने केला तरी तो चुकीचा आहे असे अजित पवार यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते. हाच मुद्दा घेऊन पंकजाताई यांनी पत्रात म्हटले आहे की, माझ्या बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री आहेत. रेमडेसिवीरच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक यांच्याकडे या समस्यांचे उत्तर नाही.

अनेक डॉक्टरांच्या स्वाक्षर्‍या घेऊन रेमडेसिवीर देण्यात आले असे दाखवण्यात आलेले आहे पण ते रुग्णांनाच काय डॉक्टरांनाही मिळाले नाहीत. दहशतीच्या वातारवणामुळे डॉक्टर्स यावर व्यक्त होत नसले तरी ही मी जबाबदार नागरिक म्हणून आपणास सांगते ही परिस्थिती सत्य आहे.

जिल्हा शल्यचिकीत्सक आणि जिल्हाधिकारी यांच्यावर प्रचंड दबाव आहे असे त्यांचे वर्तन अयोग्य आहे. प्रशासनावर येथील जनता अत्यंत नाखूष आहे. आपण जातीने यात लक्ष घालावे आणि कोरोना काळात जनतेला न्याय देण्याच्या संदर्भात आपण जो स्पष्टवक्तेपणा व्यक्त केला आहे त्यावर आपण पावलं उचलली तर अनेक समस्यांचे निरसन होईल. रेमडेसीवीर इंजेक्शन हे वैयक्तिक कोणाच्या घरातून वाटप होत आहे, विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहे हे चूक आहे आपण हे स्वतः बोललात याच्या विपरीत बीडमध्ये व्यवहार होत आहे.

आपण यात लक्ष घालावे आणि याबाबतीत आपण कानउघाडणी नक्कीच करावी कारण नागरिकांच्या जीवन-मरणाचा हा प्रश्न आहे. कोणतेही औषध, कोणतीही लस, कोणताही उपचार ही कोण्या पक्षाची, वर्गाची मक्तेदारी नाही. त्यामुळे यात सर्वांना समान न्याय मिळेल यासाठी आपण लक्ष द्याल अशी अपेक्षा पंकजाताई मुंडे यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
••••

Exit mobile version