Site icon लोकाशा-बंब न्यूज

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा परळीत कोरोना रूग्णांसाठी ३ मे पासून सेवा यज्ञ – पंकजाताई मुंडे यांची घोषणा,आयसोलेशन सेंटरची उभारणी ; बाधित महिला रूग्णांच्या घरी जेवणाचा डबा पोहचविणार

परळी । दिनांक२५ ।
कोरोना महामारीचे दिवसेंदिवस वाढत जाणारे संकट लक्षात घेऊन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी परळीत कोरोना रूग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘सेवा यज्ञ’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत लक्षणे नसलेल्या परंतू कोरोना पाॅझेटिव्ह असलेल्या रूग्णांसाठी विलगीकरण (आयसोलेशन) केंद्र उभारण्याचे तसेच बाधित महिला रूग्णांच्या घरी जेवणाचे डबे पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे हया दोघीही सध्या क्वारंटाईन आहेत, असे असताना देखील त्यांनी परळी मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व्हर्चुअल बैठक घेऊन संवाद साधला व सध्याच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीस अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरोना रूग्णांबद्दल प्रचंड सहानुभूती व सेवा करण्याचा त्यांचा उत्साह यावेळी दिसून आला.

बैठकीच्या सुरवातीला भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. कोरोना आजाराने नुकतेच निधन झालेले अंगरक्षक गोविंद मुंडे, कासारवाडीचे प्रभू दहिफळे तसेच ज्ञात-अज्ञात नागरिकांना याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली. गोविंदच्या निधनाबद्दल अतिशय सहानुभूती पूर्वक धीर दिल्याबद्दल कार्यकर्त्यांनी पंकजाताईंचे कौतुक केले.

यावेळी बोलतांना पंकजाताई मुंडे यांनी सर्वप्रथम कोरोना काळात सर्वाना स्वतःची व कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले. लाखो गेले तरी चालतील लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे अशी भावना काहींनी व्यक्त केल्यावर त्यांनी लाखो जगले पाहिजेत आणि पोशिंदाही, त्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत असे सांगितले. येणाऱ्या काळात कोरोनाला लढा देत असताना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून समाजसेवा करण्याचे मुर्तीमंत उदाहरण बनावे. प्रितमताई यांनी खासदार या नात्याने स्वतः लक्ष घालून कोविड केंद्रात जाऊन रूग्णांना धीर दिल्याचे त्या म्हणाल्या.

सेवा यज्ञ सुरू करणार

कोविड काळात रूग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान सेवा यज्ञ सुरू करणार आहे. दिवंगत नेते प्रमोदजी महाजन यांच्या ३ मे पुण्यतिथी दिनापासून ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या ३ जून पुण्यतिथी पर्यंत हा सेवा यज्ञ होणार आहे. आवश्यकता भासल्यास तो पुढेही चालू ठेवणार आहोत. या अंतर्गत लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी आयसोलेशन सेंटर तसेच बाधित महिलांच्या घरी जेवणाचा डबा पोहोचविण्यात येईल, त्याचबरोबर कोविड पेशंट असलेल्या घरात ज्यांना आवश्यक आहे, त्यांनाही जेवणाचा डबा देणार असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. ही जबाबदारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान घेणार असल्याचे सांगताच काही जणांनी देखील या यज्ञात आपापल्या परीने योगदान देऊ असे सांगितले.

वैद्यनाथ देवल कमिटीचे राजेश देशमुख, जवाहर शिक्षण संस्थेचे जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बॅन्केचे अशोक जैन यांनी संस्थेच्या माध्यमातून रूग्णांना संपूर्ण सहकार्य करण्याचा तसेच डाॅ. हरिश्चंद्र वंगे, डाॅ. शालिनी कराड, डाॅ. संदीप घुगे, डाॅ. विवेक दंडे, डाॅ. एल. डी. लोहिया, डाॅ. दिपक मुंडे, डाॅ. यशवंत देशमुख यांनीही सहकार्य करण्याचा शब्द दिला.महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस जयश्री मुंडे यांनी स्वतःचे वाहन उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

माय माऊलींची खास काळजी

पंकजाताई मुंडे यांनी या सेवा यज्ञात माय माऊलींची खास काळजी घेतली आहे. घरात आजारी पेशंट असल्यास अथवा स्वतः महिला पाॅझेटिव्ह आल्यास घरातली माऊली चुलीसमोर बसू शकत नाही, कुटुंबासमोर जेवणाचा प्रश्न उभा राहतो. अशावेळी संपूर्ण कुटुंबाला जेवणाचा डबा घरपोच देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या समवेतच कोविड पेशंट असलेल्या घरात ज्यांना आवश्यकता भासेल त्यांना आणि ग्रामीण भागातील पेशंटला सुध्दा जेवणाची सोय करू असे त्यांनी सांगितले.

भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, विनोद सामत, श्रीहरी मुंडे, विजय मुंडे, पवन मुंडे, नितीन ढाकणे, महादेव इटके, अरूण पाठक, योगेश पांडकर, नितीन समशेट्टी, प्रकाश जोशी, राजाभाऊ दहिवाळ, सुचिता पोखरकर, वैजनाथ जगतकर, नरेश पिंपळे, अनीश अग्रवाल, कुमार खोसे, शुभांगी गिते, नेताजी देशमुख, रवि कांदे, बिभीषण फड, महादेव फड,संजय मुंडे, संतोष सोळंके, सुरेश माने, लक्ष्मीकांत कराड, जीवनराव किर्दंत, गणेश कराड, गयाताई कराड, दिनकर लव्हारे आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
••••

Exit mobile version