बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व पेठ बीड भागातील नागरिकांची होणारी गैरसोय हे चित्र पाहता कोरोनाच्या लसीकरण केंद्र पेठ भागात सुरू करण्याची मागणी भगीरथ बियाणी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांच्या याच मागणीची दखल जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतली आहे.त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी पेठ बीड भागातील वतार वेस आणि मोमीनपुरा याठिकाणच्या आरोग्य उप केंद्र अशा दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केले आहे. याबद्दल बियाणी यांनी जिल्हाधिकार्यांचे आभार मानले आहेत.
शहरातील लोकसंख्याचा विचार न करता प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू केले होते. यामुळे जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर लस घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र होते. यामुळे पेठ बीड भागातील लोकांची गैरसोय होत असल्याने भाजपचे युवा नेते भगीरथ बियाणी यांनी माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना निवेदन देऊन पेठ बीड भागात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीचा विचार करत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पेठ बीड भागातील वतार वेस येथील आरोग्य उपकेंद्र व मोमीनपुरा येथील आरोग्य उपकेंद्र या दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केल्याने पेठ बीड भागातील सामान्य जनतेला होणारा त्रास कमी होणार आहे. भगीरथ बियाणी यांच्या मागणीला यश आल्याने नक्कीच याचा फायदा पेठ बीड भागातील जनतेला होणार आहे. याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे आभार मानले आहेत.