बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : अचाणक ऑक्सिजन बंद झाल्याने येथील जिल्हा रूग्णालयात दोन रूग्णांचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करा, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
शनिवारी पहाटे जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक सातमध्ये पॉझिटीव्ह असलेले दोन रूग्ण दगावल्याची घटना घडली. अचाणक ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाल्यामुळे रूग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून रूग्णालयाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने समोर आला आहे. जिल्हा प्रशासनाने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगून पंकजाताई मुंडे यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान याची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर तात्काळ जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.