अंबाजोगाई : कोरोनाने महाराष्ट्रासह देशभरात सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकतीच राज्यातील सर्व आमदारांना त्यांच्या स्थानिक निधीतून एक कोटी रुपये कोरोना विरुद्धच्या उपाय योजनांसाठी खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर तत्काळ निर्णय घेत केज मतदार संघाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी स्वाराती रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी स्थानिक आमदार निधीतून एक कोटी रूपयांचा निधी दिला आहे. यासोबतच आ. मुंदडांनी आतापर्यंत एकूण दिड कोटी रूपयांचा निधी कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी दिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्गाचा वेग प्रचंड आहे. पहिल्या लाटेपेक्षा प्रतिदिन तिपटीने बाधित रूग्ण यावेळेस सापडत असून संपूर्ण कुटूंब पाॅझिटीव्ह होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा कठीण क्षणी अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालय आणि स्व.डाॅ. विमलताई मुंदडा यांनी दिलेल्या लोखंडी सावरगाव येथील रूग्णालयाच्या इमारतीत सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर कोरोना रूग्णांसाठी वरदान ठरले आहे. जिल्हाभरातील रूग्णांचा ओढा या दोन्ही ठिकाणी आहे. ज्या कोराना रूग्णांची प्रकृती अत्यावस्थ होते त्यांना स्वारातीच्या कोविड अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येते. वाढत्या रूग्णसंख्येमुळे स्वाराती रूग्णालयातील साधनसामुग्री अपुरी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी स्वाराती रूग्णालयात कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी आमदार फंडातून एक कोटींचा निधी जाहीर केला आहे. या निधीतून ५० आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्स, ५० बायपॅप मशीन्स, साईड रिलींगसह २० आयसीयू बेड्स आणि ०६ व्हेंटीलेटर्स देण्यात यावेत असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात सूचित केले आहे. ही सर्व यंत्रसामुग्री उत्कृष्ट दर्जाची आणि हाफकिनकडून खरेदी करावी असेही पत्रात कटाक्षाने नमूद करण्यात आले आहे. लवकरच ही यंत्रसामुग्री स्वाराती रुग्णालयाला प्राप्त होणार असून त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
यंत्रसामुग्रीबाबत डॉक्टरांशी केली चर्चा :
आ. नमिता मुंदडा यांनी स्वाराती रुग्णालयातील प्रमुख डॉक्टरांशी चर्चा करून कोरोना रुग्णांसाठी कुठल्या बाबी अति प्राधान्याने गरजेच्या आहेत हे जाणून घेतले. त्यानंतर सदरील यंत्रसामुग्री पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांची माहिती घेऊन उत्कृष्ट दर्जाची उपकरणे घेण्याचे निश्चित करण्यात आले.
यापूर्वी दिला ५० लाखांचा निधी :
आ. नमिता मुंदडा यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील आमदार फंडातून ५० लाखांचा निधी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी दिला होता. या निधीतून लोखंडी सावरगावच्या रुग्णालयातील ऑक्सिजन पाईनलाईनचे काम करण्यात आले होते.
प्रतिनिधित्वाची संधी दिलेल्याची सेवा करणे माझे काम :
केज विधानसभा मतदार संघातील जनतेने मला त्यांची प्रतिनिधी म्हणून विश्वासाने विधानसभेत पाठविले आहे. माजी मंत्री. स्व.डॉ. विमलताई मुंदडा आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी अनेक वर्षे निष्ठेने मतदार संघातील जनतेची सेवा केली. तोच सेवेचा वारसा मला पुढे चालवायचा आहे. मला प्रतिनिधित्वाची संधी देणाऱ्या मतदार संघातील जनतेसाठी काम करणे हे माझे कर्तव्यच आहे.
-आ. नमिता मुंदडा